आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय समितीची स्थापना
पुणे – महापालिकेच्या 2021-22 च्या अंदाजपत्रकाची अंमलबजवाणी महापालिकेकडून सुरू झाली असली तरी, यंदाही अंदाजपत्रकातील अनावश्यक कामांना कात्री लागणार आहे. पुढील वर्षभरातील महत्वाच्या वित्तीय उपाय योजनांसाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे या समितीची मान्यता घेऊनच सर्व विभागप्रमुखांना देखभाल दुरूस्ती, सुरू असलेल्या कामांसाठी निधी तसेच नवीन भांडवाली कामांना मान्यता घ्यावी लागणार आहे. त्यातच, शहरात करोनाच्या नवीन बाधितांचा आकडाही मोठया प्रमाणात वाढला असल्याने आरोग्य व्यवस्थेवर महापालिकेस मोठया प्रमाणात उपाय योजना कराव्या लागणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन यंदाही प्रशासनाकडून अनावश्यक भांडवली कामांना कात्री लावण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी महापालिकेचे आर्थिक वर्षच करोनाच्या लॉकडाऊनमधे सुरू झाले. त्यामुळे, करोना नियंत्रणासाठी मोठया प्रमाणात खर्च करावा लागणार असल्याने राज्यशासनाने महापालिकेस केवळ 40 टक्केच विकासकामे करण्यास मुभा दिली होती तसेच त्यातही देखभाल-दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय उपाय योजना समिती नेमण्याच्या सूचना शासनाने केल्या होत्या.
या समितीने मागील वर्षी डिसेंबर 2020 अखेर पर्यंत अनेक अनावश्यक कामे रोखली होती. त्यानंतर मात्र, प्रशासनाने जवळपास 1 हजार कोटींच्या निविदांना मंजूरी दिली, तर मागील वर्षीच्या काही कामांनाही मुदतवाढ दिली. त्यानंतर, मात्र, प्रशासनावर आर्थिक ताण येऊ लागल्याने ही समिती मार्चच्या दुसऱ्या आठवडयात बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर मात्र, आता पुन्हा नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्याने अनावश्यक कामांना आळा घालण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
असे असतील समिती सदस्य…
या समितीचे अध्यक्ष महापालिका आयुक्त विक्रम कुमार असणार असून ज्या खात्याचे काम असेल त्या खात्याचे अतिरिक्त आयुक्त, तसेच संबधित खात्याचे विभाग प्रमुख हे त्या त्यावेळच्या बैठकीचे सदस्य असणार आहेत. तसेच प्रत्येत सोमवारी महापालिका आयुक्त कार्यालयाकडून या वित्तीय समितीच्या बैठका घेतल्या जाणार असून त्यात, देखभाल- दुरूस्ती, स्पील ओव्हरची कामे तसेच भांडवली कामांच्या प्रस्तावांवर चर्चा करून त्याबाबत मान्यता दिली जाणार आहे.