नवी दिल्ली : आसाममध्ये विधानसभेच्या ३९ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान नुकतेच पार पडले. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर एक व्हिडीओ समोर आला. ज्यात एका गाडीमध्ये ईव्हीएम मशीन आढळून आले. महत्त्वाचे म्हणजे ज्या गाडीत ईव्हीएम मशील सापडले ती गाडी भाजपा उमेदवाराची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विरोधकांनी भाजपावर टीका करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.
आसाम विधानसभेच्या ३९ जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झालं. मतदानानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडीओत एका गाडीत ईव्हीएम मशीन सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ज्या गाडीमध्ये हे ईव्हीएम मशीन सापडले, ती कार भाजपा उमेदवाराची असल्याचे समोर आले आहे. या घटनेची चर्चा सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगाने यावर खुलासा केला आहे.
Breaking : Situation tense after EVMs found in Patharkandi BJP candidate Krishnendu Paul’s car. pic.twitter.com/qeo7G434Eb
— atanu bhuyan (@atanubhuyan) April 1, 2021
“ज्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ती कार भाजपा उमेदवार कृष्णेंदू पाल यांची आहे. कृष्णेंदू पाल पाथरकांडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. निवडणूक आयोगाची गाडी बंद पडली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एका गाडीला लिफ्ट मागितली. नंतर ही कार भाजपा उमेदवाराची असल्याचं कळालं,” असे आयोगाने सांगितले.
लोकांनी या घटनेची तक्रार केल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी गाडीमध्ये ना मतदान अधिकारी होता, ना निवडणूक आयोगाचा कर्मचारी. या प्रकरणी निवडणूक आयोगाने करीमगंज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, याप्रकरणी चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.