समिती अध्यक्षपदांवरून भाजपमध्ये वाद

नियुक्‍तीवरून ज्येष्ठ सदस्यांमध्ये नाराजी; क्रीडा समिती सदस्यपदाचा चोरबेले यांचा राजीनामा

पुणे – महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पालिकेतील सत्ताधारी भाजपकडून इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नगरसेवकांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नगरसेवकांकडून थेट नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. 

सलग तीन वेळा सभासद असूनही तसेच जैन समाजाचा एकमेव नगरसेवक आणि व्यापारी प्रतिनिधी असतानाही क्रीडा समिती अध्यक्षपदाची संधी देण्यात आली नसल्याने नगरसेवक प्रविण चोरबेले यांनी क्रीडा समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. आधीच, स्थायी समिती, सभागृह नेतेपद, उपमहापौरपद आणि पीएमपीच्या अध्यक्षपदाच्या नियुक्‍त्यांवरून अनेक ज्येष्ठ नगरसेवक नाराज असतानाच; पुन्हा एकदा भाजपमधील वाद चव्हाटयवर आला आहे.

आपल्या राजीनान्याबाबत बोलताना चोरबेले म्हणाले की, मी पक्षातील जैन समाजाचा तसेच व्यापाऱ्यांचा एकमेव सदस्य आहे. गेल्या पाच वर्षात पक्षाकडून मला सलग तीन वर्षे क्रीडा समिती देण्यात आली. मात्र, दोन वेळेस मागूनही अध्यक्षपद देण्यात आले नाही. त्यानंतर शेवटच्या वर्षासाठी तर पद मिळावे, अशी मागणी केली.

मात्र, त्यानंतरही आपल्याला अध्यक्षपदावरून डावलण्यात आले आहे. आपण क्रीडा समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. पक्ष योग्य पदावर संधी देत असल्यामुळे व्यापारी वर्ग नाराज असल्याचे चोरबेले म्हणाले.

त्यामुळे आपण महापौर आणि सभागृहनेते यांच्याकडे राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. तर पक्षाकडून केवळ नवीन लोकांना संधी देण्याच्या नावाखाली प्रत्येक वेळी ज्येष्ठ सदस्यांना डावलेले जात असल्याची नाराजीही चोरबेले यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.