कराड – पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने दोन अज्ञान व्यक्तींनी अंजली मानसिंग पाटील (वय 75) या वृद्धेचे सुमारे एक लाख 37 हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले. ही घटना गुरुवार, 30 रोजी दुपारी बारा वाजता कराड येथील शिवाजी हौसिंग सोसायटीमध्ये घडली.
अधिक माहिती अशी, गुरुवारी शिवाजी हौसिंग सोसायटी येथे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अंजली पाटील या किचन रुममध्ये असताना दोन अनोळखी इसम त्यांच्या घराबाहेर आले. आमच्याकडे तांबे व पितळेची भांडी स्वच्छ करण्याची पावडर आहे. तुमच्या घरातील भांडी आम्ही स्वच्छ करून देऊ असे त्या इसमांनी अंजली पाटील यांना सांगितले.
त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या दोघांना अंजली पाटील यांनी घरातील तांब्यांची भांडी व देवाची चांदीची मूर्ती दिली. त्यांनी ती भांडी व मूर्ती स्वच्छ करुन दिली. त्यानंतर एक टोपण असलेला डबा आणण्यास सांगितला व त्यांच्या जवळ असलेली पावडर डब्यात टाकली. त्यात सोने असेल तर टाका आम्ही स्वच्छ करून देतो असे सांगितले.
अंजली पाटील यांनी जवळील चार तोळे वजनाच्या 4 सोन्याच्या बांगड्या व गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची माळ त्यांच्या जवळ दिली. त्यानंतर काही वेळाने आम्ही बांगड्या व सोन्याची माळ टोपण असलेल्या डब्यात ठेवली आहे. तो डबा गॅसवर ठेवून पाणी गरम करा, सोन्याचे दागिने आपोआप साफ होतील असे सांगीतले. त्या इसमाच्या बोलण्यावर अंजली पाटील यांनी विश्वास ठेवत तो टोपण लावलेला डबा किचनमधील गॅसवर ठेवला.
थोडावेळ पाणी गरम झाल्यावर तो डबा उघडुन पाहिला असता त्या पाण्यामध्ये सोन्याचा बांगड्या व सोन्याची माळ नव्हती. त्यामुळे पाटील यांनी बाहेर जाऊन पाहिले असता ते दोन इसम घरात नव्हते. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अंजली पाटील यांनी शहर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रसंगी दोन अनोळखी इसमानवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.