भांबोली फाटा – वासुली फाटा – पडवळ वस्ती रस्ता दुरुस्तीच्या प्रतिक्षेत
शिंदे वासुली – अल्पावधीतच विकसीत होत असलेल्या चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील भांबोली फाटा ते वासुली फाटा ते पडवळ वस्ती या तीन ते चार किलोमीटर रस्त्याला कोणी वाली आहे का वाली ? असे म्हणण्याची वेळ आली आहे. तर अत्यंत वर्दळ व रहदारी असलेला मुख्य रस्ता मात्र शासनाच्या दोन विभागाच्या वादामध्ये दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.
चाकण-करंजविहीरे रस्त्यापैकी चाकण ते भांबोली फाटा व पडवळवस्ती ते करंजविहीरे रस्त्याचे विस्तारीकरण व नुतनीकरण होणार आहे. शिंदे, वासुली, भांबोली, सावरदरी, वराळे या एमआयडीसी असलेल्या गावांतील प्रमुख जिल्हा मार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांना राज्यशासन अथवा जिल्हा परिषद रस्ता बांधणीसाठी निधी देत नाहीत.
ज्या गावात एमआयडीसी आहे तेथील रस्त्याची दुरुस्ती, नूतनीकरण किंवा विस्तारीकरण करणे एमआयडीसी प्रशासनाची जबाबदारी आहे. असे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचे म्हणणे आहे. त्यामुळे चाकण ते करंजविहीरे नविन सिमेंट रस्ता बांधला जात असताना भांबोली फाटा ते पुढे पडवळ वस्ती जिथे एमआयडीसीची हद्द संपते तो 3 ते 4 किलोमीटर पर्यंतचा रस्ता वगळला असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, या रस्त्याला ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी तर डांबराचा मागमुसच दिसत नाही. भांबोली ग्रामपंचायतीने मुरूम टाकून तात्पुरे खड्डे भरले होते. दरम्यान, भांबोलीचे सरपंच सागर निखाडे व ग्रामस्थांनी शासनाच्या आडमुठे धोरणाचा निषेध करुन लवकरच एमआयडीसी विभागाला रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन देणार असल्याचे सांगितले. शासनाने दोन्ही शासकीय विभागांचा गुंता सोडवून रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी येथील नागरिकांनी
केली आहे.
फसवणूक झाल्याने जनता संतप्त
हायवे हायब्रीड ऍन्युटी कार्यक्रमांतर्गत चाकण ते वासुली फाटा ते करंजविहीरे या सुमारे 21 किमी रस्त्याचे विस्तारीकरण व नुतनीकरण कामाला मागील सहा महिन्यांपासून सुरुवात झाली आहे. हा रस्ता जमीन सपाटीपासून पाच ते सात फूट खोदाई करुन मुरुमाचा भराव करुन आता असलेल्या रस्त्यापेक्षा दीड ते दोन फूट उंची वाढवून सिमेंटचा रस्ता बांधला जात आहे. त्यामुळे असा रस्ता भांबोली, वासुली हद्दीत होणार आहे, या उत्सुकतेपोटी माहिती घेतलेल्या नागरिकांना मात्र सरकारकडून फसवणूक झाल्याचे समजल्याने नाराज व संतप्त झाले आहेत.
चाकण ते करंजविहिरे रस्त्याच्या कामामधून भांबोली, वासुली फाटा वगळला असल्यास त्या रस्त्याला वेगळी तरतूद करण्यात येईल.
– दिलीप मोहिते पाटील, आमदार
सार्वजनिक बांधकाम विभागाने एमआयडीसी बाधीत रस्ते आमच्याकडे वर्ग केल्यास रस्त्यांची कामे करणे शक्य होईल. अजुनतरी तशी कार्यवाही झाली नसल्याने तुर्तास तरी रस्ता करता येईल असे वाटत नाही.
– अतुल ढोरे, उपमुख्य, अभियंता चिंचवड विभाग