पिंपरी – छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पुरंदर किल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवार (दि.14) सकाळी 9 वाजता खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी, विविध मान्यवरांना पुरस्कराने गौरविण्यात येणार आहे.
याप्रसंगी, मंगळवारी सकाळी 9.30 वाजता पाळण्याचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर राजेंद्र कांबळे यांचा शाहिरी जलसा, 10 वाजता पालखी मिरवणूक, शिवकालीन नाणी व शस्त्रास्त्र प्रदर्शन, 10.30 वाजता शिवव्याख्याते निलेश जगताप यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच, सकाळी 11 वाजता अभिनेते भरत जाधव, कादंबरीकार सुशील धसकटे व ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, अभिनेते सयाजी शिंदे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, जि. प. सदस्य रोहित पवार, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप, अर्चना जाधव, अभयसिंह सावंत, शांताराम कुंजीर, राहूल पोकळे आदी उपस्थित राहणार आहेत.