आमदार जगताप राष्ट्रवादीचे “टार्गेट’

चिंचवडमधून राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी करू – संजोग वाघेरे

पक्षाच्या वरिष्ठांची भूमिकाही महत्त्वाची

आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केल्यानंतरच खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीला गळती लागली. राष्ट्रवादीतील महत्त्वाचे मोहरे त्यांनी भाजपात नेल्यामुळे पक्षाची अवस्था दयनीय झाली. जगताप यांच्या विरोधातील लढाईला पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून किती रसद पुरविली जाते आणि स्थानिक नेते मंडळी किती एकजूट राहतात, यावरच बरेच गणित अवलंबून आहे. मात्र राष्ट्रवादीने आज जगतापांच्या विरोधात रणशिंग फुंकले एवढे मात्र नक्की.

पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचा येत्या विधानसभा निवडणुकीत पराभव निश्‍चित आहे. त्यांचा पराभव करण्यासाठी संपूर्ण राष्ट्रवादी एकजुटीने काम करेल, असा विश्‍वास राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी व्यक्‍त केला. या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, मोरेश्‍वर भोंडवे, जावेद शेख, विनोद नढे, पंकज भालेकर, प्रविण भालेकर, निकिता कदम आदी राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा शहराध्यक्ष वाघेरे यांच्याकडे सुपूर्त केला.

राजीनामा स्विकारल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत वाघेरे बोलत होते. साने यांनी विरोधी पक्षनेता म्हणून केलेले काम, लोकसभेत पार्थ यांचा झालेला परावभ तसेच अमोल कोल्हे यांचा झालेला विजय या बरोबरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत त्यांनी यावेळी भाष्य केले. वाघेरे म्हणाले, चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला होता. मात्र गतवेळी या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला.
|
लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांचे काम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने एकजूट होऊन केले त्याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीतही काम केले जाईल. पार्थ यांच्या प्रचाराची धुरा राबविताना तसेच नियोजन करताना काही चुका झाल्या. या चुका पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. चिंचवडमध्ये पक्षाकडून योग्य उमेदवार दिला जाईल, तसेच लक्ष्मण जगताप यांचा पराभव करून पक्षाचा उमेदवार विजयी करण्यासाठी ताकद लावली जाईल. शहरातील इतर दोन्ही मतदारसंघातही पक्षाकडे तगडे उमेदवार असल्याचा दावा दत्ता साने यांनी केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)