मराठी शाळांना पुन्हा ‘अच्छे दिन’

विद्यार्थ्यांना मराठीची गोडी : इंग्रजी माध्यमातील 90 हजार विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

पुणे – राज्यातील इंग्रजी माध्यमातील 90 हजार विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेची आवड कायम राहिली आहे. यामुळेच विद्यार्थी पुन्हा शिक्षणासाठी मराठी माध्यमाकडे आकर्षित होऊ लागले असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणांसाठी प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल अधिक होता. यामुळे काही ठिकाणच्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्यामुळे मराठी शाळा बंद पडण्याची अवस्था निर्माण झाली होती. मराठी माध्यमांपुढे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे मोठे आव्हानच उभे राहिले होत; पण शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून मराठी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थी वळावेत यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. त्याचा अखेर फायदा झाला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून विविध प्रकारे भरमसाठ फी सतत आकारली जाते. या शाळांमधील शिक्षणाकरिता मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असल्याने सामान्य नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आढळून येते. काही इंग्रजी शाळांमधील शिक्षण घेणे विद्यार्थ्यांना अवघड जात असल्याच्या बाबी उघडकीच येऊ लागल्या आहेत.

मराठी शाळांचा दर्जा सुधारतोय
मराठी माध्यमातील शाळांचा शैक्षणिक दर्जा चांगला सुधारत आहे. या शाळांमध्येही इंग्रजी उत्तम प्रकारे शिकविण्यात येऊ लागले आहे. त्याचे आकलनही विद्यार्थ्यांना सहजासहजी करून देण्यात येत आहे. यामुळे पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेतून काढून मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा धडाका लावला आहे. सन 2018-19 या एका वर्षात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 90 हजार 10 विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमात पुन्हा प्रवेश घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (विद्या प्राधिकरण) उपसंचालक विकास गरड यांनी दिली आहे.

मराठी माध्यमाच्या इयत्ता पाचवीच्या वर्गात सर्वाधिक 28 हजार 396 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून सर्वात कमी प्रवेश नववीच्या वर्गात 2 हजार 274 एवढे झाले आहेत. दुसरीच्या वर्गात 15 हजार 467, तिसरीमध्ये 13 हजार 434, चौथीच्या वर्गात 9 हजार 951, सहावीच्या वर्गात 9 हजार 79, सातवीच्या वर्गात 6 हजार 32, सातवीमध्ये 6 हजार 32, आठवीमध्ये 5 हजार 377 याप्रमाणे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. राज्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यात 7 हजार 24 विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमात प्रवेश घेतला आहे. सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 385 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×