चोरीला गेली पत्नीच्या प्रेमाची निशाणी; कोल्हापूरच्या मुक्त सैनिक वसाहत घरफोडीत चोरट्यांचा डल्ला

कोल्हापूर – फुललेल्या सुखी संसारात पत्नीने वाढदिवसाला पतीला प्रेमाची निशाणी म्हणून किमती भेटवस्तू दिल्या. नियतीला कदाचित हे मान्य नव्हते. दीर्घ आजाराने पत्नीचे निधन झाले. तिने दिलेल्या प्रेमाच्या भेटवस्तूंच्या आठवणींवर पती आपल्या दोन मुलांसह आपले आयुष्य जगू लागला आणि एका रात्री चोरट्यांनी त्यांच्या घरी चोरी करून आठवणीतला तो प्रेमाचा खजिना लंपास केला. बहरलेल्या संसारात दोघांनी लिहिलेली प्रेमपत्रेही चोरट्यांनी फाडून टाकली. हवालदिल झालेल्या पतीने अखेर कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात दि. १० मे रोजी तक्रार दिली.

कोल्हापुरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून आठवडाभरात 20 हुन अधिक घरफोड्या झाल्या आहेत. यामध्ये अनेकांचे दागिने,पैसे,किमती वस्तू चोरीला गेल्या आहेत. अशाच एका चोरीत पत्नीला दिलेल्या किंमती भेटवस्तूही चोरट्यानी लांबवल्याचा प्रकार घडलाय.

आपल्या पत्नीला प्रेमाखातर दिलेल्या वस्तू चोरीला गेल्याने मनोजकुमार श्रीवास्तव हावलदिलं झाले आहेत. आजारपणामुळे त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मुले लहान असतानाही त्यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार न करता फक्त या वस्तू पाहून ते आपले जीवन जगत आले आहेत. चोरट्यानी या दोघांची काही प्रेमपत्रेही फाडून टाकली आहेत. आपल्या प्रेमाची निशाणी परत मिळावी म्हणून ते पोलिसांकडे भाबडी आशा ठेवून आहेत.

त्या वस्तूंचे मागतील तेवढे पैसे देतो पण वस्तू परत देण्याचे भावनिक आवाहन त्यांनी चोरट्याना केले आहे. एका कंपनीत मॅनेजर पदावर असलेले श्रीवास्तव या चोरीच्या प्रकारामुळे मात्र पुरते हादरून गेले आहेत.बायकोच्या मृत्यूनंतरही तिच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या या प्रेमविराला त्यांच्या प्रेमाची निशाणी पोलीस शोधून देणार का हेच पाहणे आता महत्वाचे आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)