शून्य सावली दिवस : पिंपरी-चिंचवडकरांनी घेतला अनोखा अनुभव
पिंपरी – भर दुपारी सावली गायब होण्याचा अनुभव पिंपरी-चिंचवडकरांनी मंगळवारी (दि. 14) घेतला. “झिरो शॅडो डे’ (शून्य सावली दिवस) असल्याने दुपारी 12 वाजून 31 मिनिटांपर्यंत सावली नाहीशी झाली. अनेकांनी सावली गायब झाल्याची छायाचित्रे, व्हिडिओ टिपून ती सोशल मीडियावरून शेअर केली. काहींनी व्हॉटस् ऍपच्या स्टेटस् वर देखील ठेवली.
पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता ती स्वत: भोवतीसुद्धा फिरते. ती स्वत:भोवती ज्या अक्षातून फिरते, तो अक्ष उभा नसून 23.5 अंशातून कललेला आहे; त्यामुळे सहा महिने सूर्य उत्तरेकडे सरकताना दिसतो, त्याला ‘उत्तरायण’ असे म्हणतात, तर सहा महिने तो दक्षिणेकडे सरकताना दिसतो त्याला ‘दक्षिणायन’ असे म्हणतात. उत्तरेकडे सरकताना एकदा आणि दक्षिणेकडे सरकताना एकदा असा वर्षातून दोनवेळा सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर असतो. त्या वेळी तो आकाशाच्या घुमटाच्या अत्युच्य बिंदूवर असतो आणि त्याची किरणे त्या ठिकाणी लंबरूप पडतात, परिणामी कोणत्याही वस्तूची सावली बरोबर त्या वस्तूच्याच खाली पडते आणि दिसेनाशी होते. या घटनेला “झिरो शॅडो’ म्हणतात. त्या घटनेचा अनुभव पिंपरी-चिंचवडकरांनी मंगळवारी घेतला.
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात डी. आय. टी. ऍस्ट्रॉनॉमी क्लबच्या वतीने “झिरो शॅडो’वर मार्गदर्शनाचे आयोजन केले होते. जवळपासच्या भागातील काही शाळकरी मुले आपल्या पालकांसोबत ही घटना पाहण्यासाठी आले होते. 12 वाजून 20 मिनिटानंतर सावली खूपच कमी आहे व पायाखाली सरकत आहे हे जाणवत होते. तसेच टेबलवर वेग-वेगळ्या आकाराच्या वस्तू (वृत्तचिती) ठेवलेल्या होत्या. त्यांची सावली काचेतून खालच्या टेबलवर पडली होती. त्याकडेही सर्वांचे लक्ष होते. 12 वाजता टेबलावर ठेवलेल्या पाईपची सावली वर्तुळाकार नव्हती.
12.30 नंतर ती अगदी वर्तुळाकार झाली. या वेळी सर्वांच्याच चेहऱ्यावर वेगळीच घटना अनुभवल्याचा आनंद दिसत होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, प्राचार्य डॉ. एस. एन. माळी, डी. आय. टी. ऍस्ट्रॉनॉमी क्लबचे प्रा. अभय दशरथ यांनी मार्गदर्शन केले.