जगमीन, चाळकेवाडीसाठी वरदान ठरणारे धरण भरले

आ. शिवेंद्रराजेंमुळे जलक्रांती; 25 सहस्त्र घनमीटर पाणीसाठा

सातारा – सातारा-जावली मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणून विकासाचा धडाका लावणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाणीसाठवण बंधारे, छोटे- मोठे पाझर तलाव बांधून मतदारसंघात जलक्रांतीही घडवली आहे. सातारा तालुक्‍यातील जगमीन गावाजवळ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून छोटे धरण बांधण्यात आले असून नुकत्याच झालेल्या पावासात हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणामुळे जगमीन, चाळकेवाडी आणि परिसरातील वाड्या वस्त्यांचा सिंचनाचा प्रश्‍न सुटला असून पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

चाळकेवाडी, जगमीन व आसपासची गावे डोंगराळ भागात आहेत. याठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असले तरी पाणीसाठा होत नसल्याने उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी मिळत नसते. हीच समस्या ओळखून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दूरदृष्टीतून जगमीन येथे छोटे धरण बांधण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नांतून या धरणाला जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर झाला.

धरणाचे काम सुरु झाले आणि गेल्या 10 ते 12 दिवसांपुर्वीच धरणाचे काम 95 टक्‍के पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जगमीन धरण पूर्णक्षमतेने भरले असून धरणातून पाणी ओसंडून वाहत आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 25 सहस्त्र घनमीटर असून धरणातील पाण्यामुळे सुमारे 30 हेक्‍टर जमीन ओलिताखाली येणार आहे. तसेच जगमीन, चाळकेवाडी आणि परिसरातील जमिनीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ होणार असून विहिरींनाही मुबलक पाणीसाठा होणार आहे.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या कल्पक आणि दूरदृष्टीतून जगमीन धरणाची उभारणी झाली. या धरणामुळे जगमीन, चाळकेवाडी परिसरात जलक्रांती घडली असून परिसराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. ठोसेघर येथील धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना नवीन बांधलेले जगमीन धरण हे एक आकर्षण ठरणार आहे. सिंचनाचा प्रश्‍न तर सुटलाच असून परिसराच्या सौंदर्यातही भर पडल्यामुळे या भागातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण असून ग्रामस्थ आ. शिवेंद्रसिंहराजे यांना धन्यवाद देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)