राष्ट्रवादी युवकला विधानसभेच्या 15 जागा अपेक्षित

प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची माहिती; बेरोजगार युवकांसाठी लढतच राहणार

ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयात जाणार

लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर झाला. त्यानंतर उमेदवारांना प्राप्त मतांची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आली. मात्र, दोनच दिवसानंतर ती हटविण्यात आली. त्यामुळे साहजिकच ईव्हीएमवरील संशय अधिक वाढला आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाकडे वरिष्ठांनी खुलासा मागितला आहे. आयोगाने खुलासा न दिल्यास ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाणार आहे, असे शेख यांनी सांगितले.

सातारा – विधानसभेच्या निवडणुकीत युवकांना संधी देण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी इच्छुक उमेदवारांची यादी मागितली आहे. त्यानुसार निवडणूक जिंकण्याच्या निकषावरच 15 जागांची यादी लवकरच पक्षाध्यक्षांकडे सादर करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली. दरम्यान, 15 जागांमध्ये सातारा जिल्ह्यातील कोणता विधानसभा मतदारसंघ असेल, हे इतक्‍यात सांगणे धाडसाचे ठरेल, असेही शेख यांनी सांगितले.

येथील राष्ट्रवादी भवनात आयोजित आढावा बैठकीदरम्यान पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, सारंग पाटील, जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, सरचिटणीस राजकुमार पाटील, बाळासाहेब महामूलकर, गोरखनाथ नलवडे, अतुल शिंदे आदी उपस्थित होते. पवार कुटुंबियांतील युवकांना तात्काळ उमेदवारी मिळते. मात्र, सर्वसामान्य युवक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळत नाही, या प्रश्‍नाला उत्तर देताना शेख म्हणाले, “मावळ मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली. वास्तविक तो मतदारसंघ कायम भाजप-शिवसेनेचा गड राहिला आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीत रोहित पवार कर्जत- जामखेड मधून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.

तो मतदारसंघही भाजपचा पारंपरिक गड राहिला आहे. त्यामुळे दोन्ही कठीण मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी पवारांनी दाखविली.’ त्यांना निवडून यायचेच असते तर वर्चस्व असलेल्या साताऱ्यासह इतर मतदारसंघ निवडला असता. मात्र, त्यांनी तसे केले नाही, असे स्पष्टीकरण शेख यांनी दिले.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी युवक सज्ज झाली आहे. प्रत्येक बुथवर दहा युवकांची नेमणूक केली जाणार आहे. “मेरा बुथ, विकास आणि समतेचा दूत,’ ही संकल्पना राबविली जाणार आहे. सद्यःस्थितीत राज्यात बेरोजगारी प्रचंड वाढत आहे. वेटरच्या नोकरीसाठी उच्चशिक्षित अर्ज करू लागले आहेत. अर्ज पाहून नोकरी देणाऱ्यांना लाज वाटत आहे. मात्र, बेरोजगार करणाऱ्या सरकारला कोणतीही लाज वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली. बेरोजगार युवकांचा आवाज दाबला जात आहे. मात्र, आम्ही तो आवाज दाबू देणार नाही. आमच्यावर हजारो गुन्हे दाखल केले तरी आंदोलने करतच राहणार आहोत. सातारा जिल्ह्यात देखील येत्या काळात विद्यार्थी, युवक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आंदोलने हाती घेतली जाणार आहेत, असे शेख यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.