गैरसोयींकडे दुर्लक्ष करा; महापौरांचा आगळा-वेगळा सल्ला

गृहनिर्माण सोसायटी प्रतिनिधी बैठक : अधिकाऱ्यांकडून तक्रारी निवारणाचे आश्‍वासन

पिंपरी  – नागरिकांना त्यांना होणाऱ्या गैरसोयींकडे दुर्लक्ष करावे, असा आगळा-वेगळा सल्ला खुद शहराचे महापौर राहुल जाधव यांनी दिला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दर्जेदार नागरी सेवा व सुविधा देण्यासाठी महापालिका कटीबध्द आहे. मात्र विकासकामे करताना होणारा त्रास सहन करुन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले. पिंपळे सौदागर व वाकड परिसरातील पिंपरी-चिंचवड सहकारी गृह निर्माण संस्थांचा महासंघाच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांची नागरी समस्यांबाबत महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली.

स्थायी समिती सभागृहात बुधवारी (दि.3) पार पडलेल्या या बैठकीला उपमहापौर सचिन चिंचवडे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अतिरिक्त आयुक्‍तसंतोष पाटील, नगरसेविका आरती चोंधे, नगरसेवक राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, संदिप कस्पटे, स्वीकृत सदस्य मोरेश्‍वर शेडगे, शहर अभियंता राजन पाटील, सहशहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, कार्यकारी अभियंता प्रविण लडकत, संदेश चव्हाण,शिरीष पोरेडी, राजेंद्र राणे, उपअभियंता सुनिल भगवाणी, वैभव पुसाळकर, संध्या वाघ, पिंपरी चिंचवड सहकारी गृह निर्माण संस्थांचा महासंघाचे पदाधिकारी सुरेश राजे, तेजस्विनी ढोमसे, अनिता तुतारे, सचिन लोंढे, डॉ.वैष्णवी गोरडे, सुधीर देशमुख, दत्तात्रय देशमुख, के.सी.गर्ग, अमेय नार्वेकर, विवेक टिटमाणे आदी उपस्थित होते.

महापौर राहुल जाधव म्हणाले, शहराचा विकास मोठ्या झपाट्याने होत आहे. ही विकास कामे करतांना नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत असते परंतु थोडा त्रास सहन केल्यानंतर चांगले दिवस येत असतात हे विसरुन चालणार नाही. त्यासाठी विकासकामे करतांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अतिरिक्‍त आयुक्त संतोष पाटील यांनी संपूर्ण तक्रारींचे निवारण करण्यात येईल असे आश्‍वसन दिले. डॉ.के.अनिल रॉय व प्रविण लडकत यांनी कचरा व पाणी पुरवठा या विषयावर चर्चा करुन पुढील काही दिवसात हे प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचे आश्‍वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)