माय लेकराशी बोलू लागली अन्‌ चेहऱ्यावर फुलले हसू!

बाबासाहेब गर्जे

पाथर्डी: दिव्यांग असलेल्या रामा काळोखेच्या 85 वर्षे वयाच्या वृद्ध आई शांताबाई गणपत काळोखे भर उन्हात चक्कर येऊन कोसळल्या. तडफडणाऱ्या आईकडे पाहून हतबल रामा रडून मदतीसाठी याचना करू लागला. मदतीला अनेक माणुसकीचे हात धावल्याने शांताबाईंना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळाले. माय लेकराशी बोलू लागली अन्‌ सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू फुलले.

चाळीस – पंचेचाळीशीतील दिव्यांग तरुण, त्याची तीनचाकी सायकल ढकलणारी 85 वर्षे वयाची वृद्ध आई, कधीच लपवता येणार नाहीत अशा दोघांच्याही चेहऱ्यावरील प्रचंड दुःखाच्या व नैराशेच्या झळांनी करपलेली भावमुद्रा. देव पण किती निर्दयी असतो, याची कल्पना शांताबाई त्यांचा जीवनपट उलगडल्यानंतर कळते. दुःख आणि दुःखच भोगण्यासाठी जन्मलेली ही मायलेकराची जोडी शहरातील रस्त्यांवर भीक मागत फिरत असल्याचे चित्र गेली अनेक वर्षे शहरवासी पाहत आहेत. गेल्या सहा महिन्यांपूर्वी या अभागी मायलेकराची कर्मकहाणी दैनिक प्रभातने जगासमोर आणली. तरुण मुलाचे पाय बनून सायकल लोटणाऱ्या वृद्ध माऊलीची कर्मकहाणी ऐकल्यानंतर अन्न-वस्त्राबरोबरच अनेक दात्यांनी आर्थिक मदत देऊन काळोखे मायलेकरांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीचे चक्र कुणीही थांबवू शकत नाही. जिवंत आहे म्हणून जगले पाहिजे फक्त एवढाच आशावाद घेऊन दोघांचीही दिनचर्या सुरू होते.

दोन्हीही पायांनी अपंग रामा गणपत काळोखे तिनचाकी सायकलवर बसलेला. त्याची 85 वर्षे वयाची आई शांताबाई सायकल लोटत असते. दिवसभर 15 ते 20 किलोमीटर सायकल लोटून ही माय असाह्य लेकराचा अपंग संसार गेली अनेक वर्षे ओढत आहे. मात्र दिवसेंदिवस वय वाढत चालल्याने येणारा प्रत्येक दिवस या माऊलीच्या जीवनात दुःख घेऊनच येत आहे.

आज नेहमीप्रमाणेच शांताबाई मुलाची सायकल शेवगाव रोडने ढकलत असतानाच दुपारी अचानकच हरिओम कापड दुकानाच्या समोर त्यांच्या जीर्ण झालेल्या शरीराने गुडघे टेकले. भर दुपारच्या उन्हात चक्कर येऊन शांताबाई डांबरी रस्त्यावर कोसळल्या. तडफड करणारी आई पाहून स्वतः कुठलीच मदत करू न शकणारा रामा हतबल होऊन ओक्‍साबोक्‍शी रडू लागला. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याकडे मदतीची याचना करू लागला. सामाजिक कार्यकर्ते सतीश घनवट, गणेश गोरे, अतुल आंधळे यांनी तत्काळ उन्हाने तापलेल्या डांबरी रस्त्यावरून शांताबाईला उचलून सावलीत झोपवले. घटनेची माहिती समजताच अनेकांनी मदतीसाठी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. रस्त्यावरून जात असलेल्या पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर यांनीही प्रसंग लक्षात घेऊन मदतीसाठी धाव घेतली. तेथे उपस्थित असलेल्या नीलेश आठरे, बाळासाहेब चितळे, संजय बोरुडे, बाळासाहेब ढोले आदींनीही मदत केली.

बघता बघता माणुसकीचे असंख्य हात मदतीसाठी धावले. कुणी पाण्यासाठी धावले, कुणी रिक्षा आणण्यासाठी धावले, कुणी खाऊ घालण्याचा तर कुणी शांताबाईला मायेने उठवून बसवण्याचा प्रयत्न करत होते. अकोलकर यांनी शांताबाईंना स्वतःच्या हाताने पाणी पाजून बिस्किटे खायला दिली. काही वेळातच बेशुद्ध असलेल्या शांताबाई सावध होऊन मुलाचा शोध घेऊ लागल्या. आजी तुम्हाला काय खायचंय का? या अकोलकर यांच्या प्रश्नावर त्यांनी मुलाकडे नजर टाकत रामा काही खातुस का रे बाबा, असे शब्द उच्चारले. माय लेकराशी बोलली अन्‌ सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू फुलले. अकोलकर यांनी पुढाकार घेऊन शांताबाईला शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ आव्हाड यांनीच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालयातील चमुने शांताबाईवर उपचार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)