आचारसंहिता संपण्याची वाट पाहात असल्याची चर्चा
किरकोळ कामे बाकी : उद्घाटनासाठी आणखी पंधरा दिवस विलंब होण्याची शक्यता
दोनदा झाले होते उद्घाटन
या समांतर पुलाच्या एका बाजूचे उद्घाटन श्रेयवादाच्या चढाओढीत दोन-दोन वेळा करण्यात आले होते. एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने तर दुसऱ्यांदा सत्ताधारी भाजपने उद्घाटन करून पूल उभारण्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु दुसऱ्या बाजूच्या उद्घाटनाला मात्र काम बऱ्यापैकी पूर्ण होऊनही वाट पाहावी लागत आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यासच हा पूल तयार झालेला स्पष्ट दिसत होता. सध्या आचारसंहिता असल्यामुळे उद्घाटन करणे शक्य नसल्याने पुलावरील रंगरंगोटी व इतर कामे संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याठिकाणी रोज वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
पिंपरी – महापालिकेच्या वतीने हॅरिस ब्रिजला समांतर उभारलेल्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलामुळे बोपोडीकडून दापोडीकडे येताना होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार होता. त्याअनुषंगाने ही सर्व कामे एप्रिल अखेरीस पूर्ण करण्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. हा पूल एप्रिल महिन्याच्या अखेरीसच वाहतुकीसाठी खुला होईल, अशी अपेक्षा होती. परंतु निम्मा मे महिना उलटला तरी देखील हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. श्रेय घेण्यासाठी आचारसंहिता संपल्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस या पुलाचे उद्घाटन होण्याची चर्चा सध्या सुरू आहे.
उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि पुण्याला जोडणाऱ्या ब्रिटिशकालीन हॅरिस पुलाला समांतर उभारण्यात येत असलेल्या नवीन पुलाचे काम आता पूर्ण झाले आहे. जुन्या पुणे-मुंबई रोडवरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने हॅरिस पुलापर्यंतचा त्यांच्या हद्दीतील रस्ता आठ पदरी केला आहे. त्यामुळे निगडी ते दापोडी या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत नाही. मात्र, पुणे व पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरातील नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात असल्याने या पुलावर सतत वाहतूक कोंडी होते. या कोंडीतून मुक्तता करण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने संयुक्तरित्या हा प्रकल्प मे 2016 मध्ये हाती घेतला. या प्रकल्पाचा खर्च 22 कोटी 46 लाख रुपये आहे. पुलाची लांबी 202 मीटर असून रुंदी 10.5 मीटर आहे. तसेच, पुण्याकडील पोच रस्त्याची 145 मीटर असून पिंपरीच्या दिशेची 65 मीटर आहे. याचबरोबर, पुण्याकडून पिंपरीच्या दिशेने येण्यासाठी वाहनांना चार लेन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत; परंतु पूल वाहतुकीसाठी खुला न केल्यामुळे सध्या तरी नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
समांतर पुलावरील पथदिवे, संरक्षण कठडे, डांबरीकरण, रंगरंगोटी व इतर कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात आली आहेत. त्यानंतर या पुलावर वाहनांची चाचणी घेतली जाणार असून, त्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक आणि बोपोडीतून या पुलाच्या रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांचे काम बाकी असल्याने या पुलाचे काम काही दिवस संथ गतीने सुरू होते. आता अपूर्ण कामे पूर्ण करून, हा पूल सार्वजनिक वाहतुकीस खुला करून दिला जाईल.
– विजय भोजने , उपअभियंता तथा प्रवक्ता, पिंपरी-चिंचवड महापालिका.यापूर्वी देखील दापोडीकडून पुण्याकडे जाणाऱ्या हॅरिस ब्रिजला समांतर असलेल्या पुलाचे उद्घाटन सत्ताधारी भाजपने वेळेत न केल्याने, राष्ट्रवादीने पुढाकार घेऊन त्या पुलाचे उद्घाटन केले होते. त्यानंतर डोळे उघडलेल्या भाजपने पुन्हा या पुलाचे उद्घाटन करून, हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करून दिला. आता या दुसऱ्या बाजूच्या पुलाचे काम पूर्ण झाले असूनही, आचारसंहितेमुळे त्याचे उद्घाटन सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून प्रशासन पुढे ढकलत आहे. यामुळे नागरिकांना कोंडीचा त्रास होतो. याचा आम्ही निषेध करतो.
– दत्ता साने, विरोधी पक्षनेत