यशवंतनगर पुनर्वसन कृती समितीला विविध संघटनांचा पाठिंबा
पिंपरी – प्रभाग क्रमांक 9 मासुळकर कॉलनीमधील उद्यमनगर येथील आरक्षण क्र 79 या जागेवरच यशवंतनगर झोपडपट्टी पुनर्वसन “एसआरए’ प्रकल्प व्हावे, प्रकल्पाचे बंद केलेले काम तातडीने सुरू करावे, या मागणी करिता यशवंतनगर पुनर्वसन कृती समितीने महापालिकेवर मोर्चा काढला. कृती समितीच्या शिष्टमंडळाने आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेत, मागण्यांचे निवदेन सादर केले. यावेळी यशवंतनगर पुनर्वसन कृती समितीचे अध्यक्ष अविनाश चौधरी, विविध संघटनांचे पदाधिकारी व यशवंतनगर झोपडपट्टीमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दोन दिवसांपूर्वी उद्यमनगर बचाव समितीच्या वतीने यशवंतनगर झोपडपट्टी एसआरए अंतर्गत पुनर्वसन प्रकल्प व पंतप्रधान आवास योजना या दोन्ही प्रकल्पाला विरोध करीत हे प्रकल्प इतर ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर शहर अभियंता राजन पाटील यांनी आयुक्त निवडणुकीच्या कामाकरिता बाहेर गेले असल्याने ते आल्यावर बैठक घेऊन त्यावर तोडगा काढू, असे सांगत यशवंतनगर झोपडपट्टी एसआरए पुनर्वसन प्रकल्पाच्या कामाला 25 मे पर्यंत तात्पुरती स्थगिती दिली होती. दुसऱ्याच दिवशी या निर्णयाच्या विरोधात मोर्चा काढून प्रकल्प सुरू करण्याची मागणी करण्यात आली.