अखेर प्रशासनाने निश्चित केली जबाबदारी
पुणे – नदीपात्रात राजरोसपणे राडारोडा टाकून जागा बळकाविण्याला लगाम घालण्याची जबाबदारी आता महापालिका प्रशासनाने क्षेत्रीय कार्यालयांवर सोपविली आहे.
संबंधित क्षेत्रिय कार्यालयांच्या हद्दीतील नदी, नाले, ओढे यामध्ये राडारोडा टाकण्यात आल्यास संबंधित क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यावर आता तातडीने कारवाई करायची आहे. यासंबंधिचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून असे प्रकार पुन्हा वाढल्याने महापालिका प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेत असा राडारोडा टाकून तयार केल्या जाणाऱ्या भुखंडाचा सातबाराच तयार करण्यात येऊ नये, अशी मागणी पालिका प्रशासनाकडून तहसिलदारांकडे करण्यात आली असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.
शहराच्या मध्यभागातून मुळा-मुठा नदीचे पात्र वाहाते. या नदीपात्रात अनेक ठिकाणी राडारोडा टाकून थेट नदी बुजविण्याचे उद्योग सातत्याने सुरू असतात. संगमवाडी येथील नदीपात्रात अशा पध्दतीने शेकडो ट्रक राडारोडा टाकून नदी बुजविण्याचा प्रकार समोर आला आहे. अशीच स्थिती वारजे, तसेच डीपी रस्त्याच्या बाजूला होत आहे. याबाबतही प्रशासनाकडे तक्रारी आल्या असल्या तरी, त्यावर कारवाई नक्की कोणी करायची असा प्रश्न होता. त्यात महापालिकेतील बांधकाम, अतिक्रमण आणि क्षेत्रिय कार्यालयांनी एकमेकांकडे बोट दाखवत ही जबाबदारी थेट पाटबंधारे विभागाकडेच टोलावली होती. मात्र, अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा यांनी या गंभीर प्रकारावर अखेर जबाबदारी निश्चित केली आहे. याबाबत शर्मा यांनी ज्या क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत अशा पध्दतीने राडारोडा टाकला जाईल, त्यावर क्षेत्रिय कार्यालयाने कारवाई करावी. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे.