पाच कोटींचा मुद्देमाल

प्रशांत जाधव

269 संशयित…
92 केसेस…

आयपीएस समीर शेख यांची कारवाई
अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले

सातारा – सिंघम पोलीस अधिकारी वाटण्यासाठी लागतात पिळदार मिशा, अमुक इंचाची छाती. सहा फूट उंची, पिळदार शरीर आणि डोळ्यावर काळा गॉगल या सर्व गोष्टी जमल्या तर तो सिंघम पोलीस अधिकारी, यापैकी ज्यांच्याकडे काहीही नाही. त्यांचे नाव घेतले तरी अवैध धंदे करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात धडकी भरते. अनेक महाविद्यालयीन तरूण-तरुणींना आपल्या करिअरचा आयडॉल वाटणाऱ्या समीर शेख यांनी 92 केसेस मधील 269 संशयितांच्या हातात बेड्या ठोकत त्यांच्याकडून पाच कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याने जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांनी समीर शेख नको रे बाबा! असाच सुर आळवला आहे.

राज्यात डंका असलेल्या सातारा जिल्हा पोलीस दलाला डॉ. अभिनव देशमुख, संदीप पाटील, पंकज देशमुख अन्‌ तेजस्वी सातपुते अशा युवा अधिकाऱ्यांचे नेतृत्व लाभले. अशाच युवा अधिकाऱ्यांपैकी असलेले सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख हे नाव. 2015 च्या बॅचचे आयपीएस असलेल्या शेख यांचा साताऱ्यात सध्या प्रोबेशन काळ सुरू आहे. मात्र, याच काळात समीर शेख यांनी जिल्ह्यात केलेल्या कारवाया नक्कीच जिल्ह्यातील लोकांच्या लक्षात राहतील अशाच आहेत.

अवघ्या एक वर्षाच्या काळात मितभाषी शेख यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात धडकी भरवताना सामान्य लोकांना पोलीस ठाणी आपली कशी वाटतील याच्याकडेही कटाक्षाने लक्ष दिले. साताऱ्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी गजानन राजमाने यांची नागपूर येथे पदोन्नत्तीने बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी समीर शेख यांची बदली राज्य गृह विभागाने केली. अवघ्या सव्वीस वर्षाच्या शेख यांच्याकडे बघून अनेकांनी राजमाने यांच्या जाण्याच्या व नवखा अधिकारी आल्याच्या आनंदात फटाके फोडले होते. मात्र, हाच अवघ्या सव्वीस वर्षाचा तरूण अधिकारी भविष्यात आपल्याला गज मोजायला पाठवेल याची साधी कल्पनाही या फटाके फोडणाऱ्यांना नव्हती. राजमाने फक्त सातारा उपविभागातील धंदेवाल्यांच्या मुसक्‍या आवळल्या पण शेख यांनी जिल्हाच आपले कार्यक्षेत्र करून गावागावातील अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्‍या आवळल्या.

समीर शेख यांच्या पथकाने आजवर अवैध दारू विक्री करणाऱ्या 14 केसेस दाखल करून 27 संशयितांना जेरबंद केले. 29 छापे टाकून 141 जुगाऱ्यांना बेड्या ठोकल्या, महिलांना जबरदस्तीने वेश्‍या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या 5 गुन्ह्यात 10 संशयितांना अटक केली. एकूण 13 चोरीच्या गुन्ह्यात 58 संशयित पकडले यात 11 गुन्हे वाळू चोरीचे, 2 दुचाकी चोरीचे, 1 मंदिरातील घंटा चोरीचा गुन्ह्याचा समावेश आहे.

अंमली पदार्थाची (गांजा) विक्रीच्या दोन प्रकरणात तिघांना बेड्या ठोकल्या, बंदी असलेला गुटखा विक्रीच्या दोन प्रकरणात आठ जणांच्या हातात बेड्या घातल्या. खूनाचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक केली. लोकसभा निवडणुकीवेळी फरारी असलेलेल आरोपी पकडण्याचे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिले होते. त्यावेळी शेख यांनी एकूण 15 फरार संशयितांना तर हद्दपारीच्या आदेशाचा भंग करणाऱ्या दोघा संशयितांना अटक केली. या कारवाया करत असताना शेख यांनी एकूण पाच कोटी 53 लाख 51 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. शेख यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे सध्या सातारा जिल्ह्यात त्यांच्याच नावाची चर्चा सुरू आहे. अर्थातच शेख यांच्या या कामाला इनायत मुल्ला, दादासो बनकर, अंकुश यादव, मनोज शिंदे, मंगेश डोंबे या शिलेदारांचे सहकार्य असतेच.

या आहेत वाळूच्या कारवाया
समीर शेख यांनी माण तालुक्‍यातील आंधळी येथे 5 लाख 71 हजारांची कारवाई 6 संशयित, खटाव तालुक्‍यातील नागनाथवाडी येथे 7 लाख 37 हजारांची कारवाई 12 संशयित, नेर येथे दहा लाख 74 हजारांची कारवाई 3 संशयित, दरूज येथे 31 लाखांची कारवाई दहा संशयित, नढवळ येथे 52 लाख 86 हजारांची कारवाई 5 संशयित, मायणी येथे 1 कोटी 4 लाख 66 हजारांची कारवाई दहा संशयित अटक केले आहेत.

कोण आहेत समीर शेख
ठाणे शहरातील मीरा रोड परिसरातील एका मध्यम परिवारातून आलेल्या शेख यांनी जुलियो फ्रांसिस रिबेरो या आयपीएस अधिकाऱ्याकडून प्रेरणा घेऊन पोलीस दलात दाखल होण्याचा निर्णय घेतला. अभियांत्रिकचे पदवीधर असलेले शेख हे अवघ्या चोविसाव्या वर्षीच दुसऱ्या प्रयत्नात आयपीएस म्हणून निवडले गेले. त्यानंतर त्यांनी हैद्राबाद येथे प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस दलात सहाय्यक पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here