पुणे – पाणी कोट्यावरून पुन्हा पेटणार?

मुंबईत सोमवारी बैठकीचे आयोजन

पुणे – शहराची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेने शहरासाठी 17 टीएमसी पाणी देण्याची मागणी राज्यशासनाकडे केली आहे. मात्र, त्यातच आता महापालिका जादा पाणी घेत असल्याची तक्रार दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांनी राज्य शासनाच्या विनंती अर्ज समितीकडे केली आहे. त्यानुसार या समितीने येत्या सोमवारी (दि.1) मुंबईत बैठक बोलविली आहे.

विधिमंडळात सायंकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकिला नगरविकास खात्याचे सचिव नितीन करीर, महापालिका आयुक्त सौरभ यांच्यासह पाटबंधारे खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहे. महापालिका सध्या शहरासाठी 1,350 एमएलडी पाणी घेत आहे. त्यास जलसंपदा विभागाने सहमती दर्शविलेली असली, तरी प्रत्यक्षात गेल्या वर्षभरात बहुतांश वेळा शहरासाठी सुमारे 100 ते 150 एमएलडी पाणी घेण्यात आले आहे. याबाबतची तक्रारही जलसंपदा विभागाने वारंवार केली आहे. त्यातच, महापालिका जादा पाणी घेत असल्याची तक्रार बारामतीमधील एका शेतकऱ्याने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे केली होती. त्यावर निकाल देताना प्राधिकरणाने शहरासाठी केवळ 8.19 टीएमसी देण्याचे आदेश जलसंपदाला दिले होते. मात्र, शहराला वर्षासाठी साडेअकरा टीएमसी पाणी पुरवठ्याचा करार झाला असल्याने त्यानुसार सद्यस्थितीला पाणी पुरवठा होत आहे. दरम्यान, या कराराची मुदत संपली असल्याने आता नव्याने पाणी पुरवठ्याचा करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात वाढलेल्या लोकसंख्येने 17 टीएमसी पाणी कोटा देण्याची मागणी महापालिकेने जलसंपदाकडे केली आहे. मात्र, शासनाने हा कोटा अद्याप मंजूर केलेला नसला, तरी शासनाकडून मंजूर साडेअकरा टीएमसी पाण्याऐवजी कितीतरी अधिक पाणी महापालिका घेत असल्याने त्याचा जिल्ह्यातील सिंचनावर परिणाम होत आहे. त्यामुळे महापालिकेस मंजूर कोट्याप्रमाणेच पाणी देण्यात यावे, या मागणीसाठी आमदार कुल यांनी विनंती अर्ज केला आहे.

पुण्यातील आमदारांच्या भूमिकेवर लक्ष
आमदार कुल यांच्या मागणीनुसार ही बैठक होणार असली, तरी पुण्यातील भाजपच्या आठ आमदारांकडून या मागणीबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे पुणेकरांचे लक्ष असेल. महापालिकेत भाजपची सत्ता असून शहराला गरजेइतके पाणी देण्यासाठी भाजपची कसरत सुरू आहे. त्यातच आता सहयोगी पक्षांच्या आमदारांकडून पाण्याबाबत प्रश्‍न उपस्थित केल्याने आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)