टोल आंदोलनातील गुन्हे मागे घेऊ – फडणवीस

कोल्हापूर- टोल आंदोलनातील गुन्हे मागे घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. टोलविरोधी कृती समितीने विमानतळावर त्यांची भेट घेतली. यावेळी समितीच्या वतीने गुन्हे मागे घेण्याबाबतचे निवेदन त्यांना देण्यात आले.

टोलविरोधात कोल्हापुरात साडेचार वर्षे आंदोलन सुरू होते. यादरम्यान विविध पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. कोल्हापूरचा टोल राज्य शासनाने कायमचा रद्द केला. कंपनीला याबाबत भरपाईचीही सर्व रक्‍कम देण्यात आली. टोल विरोधी आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी 7 जानेवारी 2016 रोजी कोल्हापुरात जाहीर सत्कार कार्यक्रमात दिले होते. त्याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले.

मात्र, अद्याप गुन्हे कायम असल्याने कार्यकर्त्यांना न्यायालयीन प्रक्रियेला समोरे जावे लागत आहे. गेल्या साडेचार वर्षांत अनेक सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेतले आहेत. त्यानुसार टोलसह मराठा आंदोलन, पंचगंगा प्रदूषण प्रश्‍नी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी आहे.

यापार्श्‍वभूमीवर टोलविरोधी कृती समितीने गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची विमानतळावर भेट घेतली. कंपनीला झालेल्या नुकसानीसह भरपाईची रक्‍कम देण्यात आली आहे. यामुळे कंपनीचे नुकसान केले म्हणून दाखल झालेले गुन्हे रद्द करणे आवश्‍यक आहे. याबाबत आपण आदेश दिले आहेत.

त्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. टोल आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. आपल्याजवळ हे प्रकरण आले आहे. त्यावर तातडीने निर्णय घेतला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.यावेळी कृती समितीचे दिलीप देसाई, अशोक पोवार, रमेश मोरे, स्वप्निल पार्टे, किसन कल्याणकर आदी उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)