उत्साही पर्यटकांचा कास तलावात जलविहार

सातारा  – जागतिक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित झालेला कास परिसर पर्यटकांना आकर्षित करीत आहे. सुट्‌टीच्या काळात जिल्ह्याबरोबर राज्यातीलही अनेक पर्यटक या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. विशेषतः कास तलाव परिसरातील निसर्गरम्य वातावरण हे पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. या ठिकाणी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या परिसराला जागजिक दर्जा प्राप्त होत आहे.

येथे देशी विदेशी पर्यटकाबरोबरच तरुणाईची या ठिकाणीला अधिक पसंती लाभत आहे. बऱ्याचदा उत्साहाच्या भरात तरुणाईकडून या ठिकाणच्या परिसराला गालबोट लागत आहे. अनेकजण जलविहारचा आनंद लुटताना कास तलावातील पिण्याचे पाणी दूषित करत आहेत. याचे भान त्यांना उरत नाहीत. त्यामुळे अशा हौशी पर्यटकांना जरब बसविण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी पर्यावरणप्रेमी तसेच पर्यटकांमधून होत आहे.

संपूर्ण सातारानगरीला पिण्याचा पाणीपुरवठा करणारा कास तलाव शहरातील नागरिकांची ऐन उन्हाळ्यात ही तहान भागवत असताना अनेक हौशी पर्यटकांकडून गालबोट लागत असल्याच्या घटना घडत आहेत. निसर्गातील पर्यटनाचा आनंद लुटण्याबरोबर काही हौशी व अतिउत्साही पर्यटकाचा येथे अतिरेक होत असल्याने येथील परिसरास अनेकदा गालबोट लागले आहे. अनेकदा या ठिकाणी तरुणाई मौजमजा करताना मद्यपीचा होत असणारे सेवन वादविवादाला कारणीभूत ठरते तर काही अतिउत्साही पर्यटक नशेमध्येच कास तलावाचा वापर जलतरणाचा आनंद उपभोगण्यासाठी करताना दिसून येतात. ही दुर्दैवी बाब आहे.

वास्तविक सातारा नगरीला पिण्याचा पाणीपुरवठा करणारा कास तलावाच्या सुरक्षितेची यंत्रणा आता उभी करणे गरजेची भासू लागली आहे. पर्यटकाची वाढती संख्या व कास तलावात जलतरणाचे वाढते वेड पाहता येथील पाण्याचे होणारे प्रदूषण रोखणे गरजेचे बनलेले आहे. त्याचप्रमाणे येथे येणाऱ्या पर्यटकावरही अंकुश ठेवणारी यंत्रणा उभी राहणे आवश्‍यक असलेचे मत अनेक निसर्गप्रेमीकडून व्यक्‍त होत आहे.

संपूर्ण राज्यात पाण्याची तीव्र टंचाई आहे. अशा वेळी जलसाठ्यांची जपणूक करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. विशेषतः पिण्याचे पाणीपुरवठा करणारे तलाव हे दूषित न होता ते सुरक्षित राहिले पाहिजे याची दक्षता या पुढील काळात घेणे गरजेचे आहे. बऱ्याचदा दुसऱ्या जिल्ह्यातून येणारे पर्यटक आपली वाहने तलावाच्या पात्रात धुवत आहेत. यावेळी वाहनांमधील कचऱ्याबरोबरच ऑईल पेट्रोल पाण्यामध्ये मिसळत आहे. याची आता गांभीर्याने दखल संबंधित यंत्रणेने घेणे आवश्‍यक असल्याचे मत निसर्गप्रेमींकडून व्यक्‍त होत आहे. पाण्याचे दूषितीकरण करणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारायास हवा.

श्रीरंग काटेकर, सातारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)