पूना नाईट कॉलेजच्या रेखा सिरसाट यांना 70.61 टक्के गुण
पुणे – जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर घरातील काम, मुलांना सांभाळून वयाच्या 36 व्या वर्षी बारावी परीक्षेत पूना नाईट कॉलेजच्या रेखा सिरसाट यांनी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाल्या. पूना नाईट कॉलेजमध्ये बारावी परीक्षेत 70.61 टक्के गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम आल्या आहेत. विशेष म्हणजे याच शाळेत त्या दहावीतही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या.
घरची कठीण परिस्थिती आणि कमी वयात लग्न झाल्याने रेखा सिरसाट यांनी सातवीनंतरचे शिक्षण घेणे शक्य झाले नाही. “2013 साली 8 वीमध्ये पूना नाईट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेव्हापासून शिक्षणासाठी सुरुवात केली. या दरम्यान अनेक घरामध्ये प्रसंग पाहिले. पण कधीही मागे सरली नाही आणि माझे शिक्षण सुरू ठेवले. दहावीनंतर आणि आता बारावीतही मुलींमध्ये मी प्रथम आली आहे. तर मुलगा यंदा बारावीमध्ये, मुलगी दहावीत शिकत आहेत. आता पुढे मला वकील व्हायचे आहे,’ अशी भावना रेखा यांनी व्यक्त केली. तसेच “मला शिक्षण घेण्यासाठी घरातील सर्वांनी सहकार्य केले,’ असेही त्यांनी नमूद केले.