पुणे – अपघात विमा योजनेचे कवच आता संपूर्ण कुटुंबाला

महापालिकेचा निर्णय : नियमितपणे निवासी मिळकतकर भरणाऱ्यांना फायदा

पुणे – महापालिकेने गेल्या वर्षी सुरू केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजनेत आता संपूर्ण कुटुंबाला विमा कवच उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय नियमितपणे निवासी मिळकतकर भरणाऱ्या करदात्यांना आणि गलिच्छ वस्ती निर्मूलन विभागाकडील सेवाशुल्क भरणाऱ्या कुटुंबांचा समावेश करून योजनेची पुनर्रचना आणि नूतनीकरण करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी ही माहिती दिली.

पुणे महापालिकेचा निवासी मिळकतकर नियमितपणे भरणाऱ्या करदात्यांसाठी आणि ग.व.नि. विभागाकडील सेवाशुल्क भरणाऱ्या कुटुंबांसाठी गेल्या वर्षीपासून पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना सुरू करण्यात आली होती. मिळकत कर भरणाऱ्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसाला विम्यापोटी पाच लाख रुपये मिळत होते. महापालिकेने गेल्या वर्षी अंदाजपत्रकात 7 कोटी रुपयांची तरतूद केली होती. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पंधरा नागरिकांच्या कायदेशीर वारसदारांना गेल्या वर्षी या योजनेचा लाभ मिळाला होता. स्थायी समितीचे तत्कालिन अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या कल्पनेतून योजनेचा प्रारंभ झाला होता.

स्थायी समितीचे अंदाजपत्रक सादर करताना तत्कालिन अध्यक्ष योगेश मुळीक यांनी या योजनेची पुनर्रचना करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार स्थायी समितीने पुनर्रचना केलेल्या योजनेला मान्यता दिल्याचे कांबळे यांनी सांगितले.

पुनर्रचना केलेल्या योजनेत निवासी मिळकतकर धारकाच्या कुटुंबात तो स्वतः, त्याची पत्नी किंवा पती, त्याच्यावर अवलंबून असलेली 23 वर्षांखालील पहिली दोन अविवाहित अपत्य, मिळकतकरदात्याचे आई आणि वडील अशी कुटुंबाची व्याख्या करण्यात आली आहे. या सर्वांसाठी अपघाती विमा कवच उपलब्ध होणार आहे.

मिळकतकर दात्याचा किंवा त्याच्या पती/पत्नीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसाला पाच लाख रुपये मिळू शकतील. मिळकतकर धारकावर अवलंबून असलेल्या 23 वर्षांखालील पहिल्या दोन पाल्यास अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला मूळ विमा योजनेच्या 50 टक्के म्हणजे अडीच लाख रुपये मिळू शकतील. मिळकत धारकाच्या आई किंवा वडलांचा अपघाती मृत्यू झाल्यास अडीच लाख रुपये मिळू शकतील. कुटुंबातील व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा अपघात झाल्यास कुटुंबातील सर्वांना मिळून किंवा एका व्यक्तीला एका वर्षांमध्ये जास्तीत जास्त एक लाख रुपये दवाखान्यातील उपचारासाठी दिले जातील. वरील पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण एका कुटुंबातील सर्वांना मिळून किंवा एका व्यक्तीला वर्षांतून एकदा वापरता येईल. याशिवाय रुग्णवाहिकेसाठी तीन हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे.

महापालिकेचा करसंकलन विभाग आणि ग.व.नि. विभागाकडील प्राप्त आकडेवारीनुसार मार्च 2019 पर्यंत मिळकतकर आणि सेवाशुल्क भरणाऱ्यांची संख्या 6 लाख 78 हजार 90 इतकी आहे.

असा होईल दावा मान्य
पंडित दीनदयाल उपाध्याय अपघात विमा योजनेंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर गेल्या आर्थिक वर्षातील मिळकतकर किंवा सेवाशुल्क भरल्याची पावती आणि आवश्‍यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर दावा मान्य केला जाणार आहे. वार्षिक प्रीमियम अदा केल्याच्या तारखेपासून वर्षभरासाठी विमा कालावधी असणार आहे. यासाठी दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला प्रतिव्यक्ती 75 रुपये याप्रमाणे 5 कोटी 8 लाख 56 हजार रुपये अदा करण्याला स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)