अबाऊट टर्न : प्रतीक्षा…

-हिमांशू

आजपासून फक्‍त चारच दिवस… पण एकेक दिवस एका वर्षाएवढा वाटणारा. एकेक तास एका महिन्याएवढा आणि एकेक मिनिट एका दिवसाएवढा मोठ्ठा… सर्वांसाठीच. ज्यांनी परीक्षा दिली त्यांच्यासाठीही आणि त्यांच्या तमाम पाठीराख्यांसाठीही… काहीजणांनी कालच शेवटचा पेपर दिला, पण ज्यांची परीक्षा 11 एप्रिललाच झाली, त्यांची येत्या गुरुवारी संपत असलेल्या प्रतीक्षावधीत काय परिस्थिती झाली असेल, हे समजून घेण्यासाठी कवी आणि कलावंतांपेक्षाही अधिक संवेदनशीलतेची गरज आहे. त्यातल्या त्यात आता उरलेले चार दिवस तर महाभयानक म्हणावे लागतील. त्यातच काल संध्याकाळपासून एक्‍झिट पोल नावाचा भेसूर प्रकार सुरू झालाय. सर्वच क्षेत्रांप्रमाणेच याही क्षेत्रात हल्ली प्रचंड स्पर्धा आहे. मतदानोत्तर जनमत चाचणी करणाऱ्या असंख्य संस्था, कंपन्या आणि प्रत्येक संस्थेचे निष्कर्ष वेगवेगळे.

शेवटचे मत इलेक्‍ट्रॉनिक यंत्रात बंद व्हायचा अवकाश… लगेच धरणाचे दरवाजे उघडावेत तसा जनमताचा कौल धबधब्यासारखा कोसळू लागला. मतदानाचे सहा टप्पे आधीच पूर्ण झालेत हे खरे. पण तरी शेवटच्या टप्प्याचा आढावा घ्यायला थोडाफार तरी वेळ लागणे अपेक्षित असते. पण वाहिन्या आधीपासूनच जाहीर करून टाकतात की, सगळ्यात आधी आणि सगळ्यात अचूक एक्‍झिट पोल आम्हीच दाखवणार. प्रत्येकाचे निकष वेगळे आणि त्यामुळे मग निष्कर्षही वेगळे निघतात.

खरे तर “सेफॉलॉजी’ या शास्त्रात निष्णात असणारे अनेकजण असे सांगतात की, एखाद्या पक्षाला साधारण किती लोकांचा पाठिंबा आहे किंवा एखाद्या मतदारसंघात सामान्यतः कशी परिस्थिती आहे, याचे आकलन जास्तीत जास्त अचूकपणे करण्याचे हे शास्त्र असून, कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, हे अचूक सांगणे शक्‍य नसते. परंतु जनमताची चाचपणी करणाऱ्या संस्थांना मागणीप्रमाणे पुरवठा करावा लागतो.

आपल्याकडे कोणत्या पक्षाला किती जागा, यावरच कुणाच्या हाती सत्ता येणार हे अवलंबून असल्यामुळे या संस्था जागांच्या स्वरूपात आकडेवारी देतात. त्यामुळे प्रत्येक संस्थेच्या अंदाजात फरक पडणे किंवा दोन संस्थांच्या आकडेवारीत बरेच अंतर असणे, हे प्रकार अपेक्षितच आहेत. पण सामान्य माणूस असा विचार करत नाही. तो ज्या पक्षाचा समर्थक असेल, त्याला अधिक जागा देणारी संस्थाच अधिक शास्त्रोक्‍त काम करतेय, असे त्याला वाटते. परंतु प्रत्यक्ष उमेदवारांच्या मनात काय चाललं असेल, याची आम्हाला दरवेळी या चार दिवसांत अधिक काळजी वाटते.

आमच्या एका व्यावहारिक मित्राने याविषयी काल आमचे प्रबोधनही केले. म्हणाला, कुठल्याच उमेदवाराला काही टेन्शन नसते. कारण निवडणूक लढवणाऱ्यांना मतदान झाल्याबरोबर काय होणार याचा अंदाज आलेला असतो. हे ऐकून आम्हाला काही नेत्यांचे चेहरे आठवले. (प्लीज, नावे सांगण्याचा आग्रह करू नये.)

एकंदरीत, कुणाचे सरकार येणार आणि आपल्या मतदारसंघातून कोण जिंकणार, याचंही टेन्शन अखेर केवळ सामान्य माणसालाच असते… अर्थात, त्याचा एक मोठा फायदा असतो. या निमित्ताने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जो धुमाकूळ राजकीय पक्षांकडून आणि नेत्यांकडून घातला जातो, त्याचा पूर्ण विसर पडतो. वादग्रस्त वक्तव्ये, आश्‍वासने, भ्रष्टाचाराचे आरोप वगैरे मागे पडतात. निकाल लागला की सगळे पुन्हा नव्याने सुरू होते… फ्रेश मनाने. चला, यंदा टेन्शन न घेता प्रतीक्षा करूया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)