पाचव्या मजल्यावरील फ्लॅटला आग; दहा लाखांचे झाले नुकसान

फ्रिजच्या कॉम्प्रेसरमधून गॅस लिकेज झाल्याने स्फोट

पिंपरी – फ्रीजच्या कॉम्प्रेसरमधून गॅस लिकेज होऊन झालेल्या स्फोटात घराला आग लागली. ही घटना कासारवाडी येथील सागर हाईट्‌स इमारतीमधील पाचव्या मजल्यावर आज (रविवार) दि. 19 मे रोजी पहाटे पावणेदोनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवतीहानी झालेली नसून दहा लाखांचे साहित्य जळून खाक झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सागर हाईटस्‌ इमारतीमधील पाचव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये फ्रिजच्या कॉम्प्रेसरमधून गॅस लिकेज झाल्याने किचनमध्ये पहाटे पावनेदोन वाजण्याच्या सुमारास आग लागली. आग लागल्याचे समजताच घरातील सर्वजण तातडीने बाहेर पडले व अग्निशामक दलाला माहिती दिली.

त्यानंतर अग्निशमन केंद्र, भोसरी विभागाचे दोन बंब आणि एक देवदूत वाहन घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. मात्र, जागा अपुरी असल्यामुळे अग्निशामक दलाची वाहने इमारतीपर्यत पोहचू शकत नव्हती. त्यामुळे 15 होप पाईप लावून आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशामक दलाच्या जवांनानी केले. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

आगीमध्ये घरातील फ्रीज, वॉशिंग मशीन, किचनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. यामध्ये सुमारे 10 लाखांचे नुकसान झाले. तसेच या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. या आगीमुळे संपूर्ण इमारतीमध्ये मात्र भितीचे वातावरण निर्माण झाल्याने संपूर्ण रात्र रहिवाशांनी जागून काढली. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे अधिकारी अशोक कानडे, फायरमन लक्ष्मण ओवाळे, अमोल चिपळूणकर, बाळकृष्ण भोजने, कैलास डोंगरे, मनोज चव्हाण, महेश चौधरी, वाहन चालक देवा जाधव, प्रमोद जाधव, शंकर ढाकणे आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.