दिशादर्शक प्रचार हेच भाजपचे बलस्थान

महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांचा प्रचार अखेरच्या टप्प्यात

बारामती – बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये इतिहास घडविण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. बारामती मतदारसंघात प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना दिशादर्शक प्रचाराची आखणी हे कांचन कुल यांच्या प्रचार यंत्रणेचे बलस्थान ठरले आहे. यामुळे विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वासही कुल यांनी व्यक्त केला आहे. बारामती मतदारसंघातील भाजपचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आला आहे. या विषयी कुल बोलत होत्या. बारामतीची निवडणूक म्हणजे केवळ सोपस्कार उरली आहे. भाजपची यंत्रणा सक्षम करण्यात असूून बारामतीत रुजलेले विचार परिवर्तनाची मोठी किमया साध्य करण्यात यश आले असल्याचेही कुल यांनी स्पष्ट केले.

याबाबत अधिक माहिती देताना सहप्रभारी गणेश बिडकर म्हणाले की, बारामतीमध्ये पवारशाहीला आव्हान देण्याचा विचारही यापूर्वी कोणी करू शकत नव्हते. यंदा, मात्र ती परिस्थिती निर्माण झाली आहे. कांचन राहुल कुल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती जिंकण्याचा विडा उचलत मतदारसंघात शड्डू ठोकल्याने “अब की बारी बारामती हमारी…,’ “तुमचे एक मत खास बारामतीत घडवेल इतिहास…’, “तुमच्या बोटावरची शाई उलथवेल पवारशाही…’, अशा घोषणांच्या माध्यमातून बारामतीमध्ये वातावरण निर्मीती झाली आहे. बारामती हमारी आणि बारामतीला बदल हवा, अशा गीतांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे.

यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, राज्यमंत्री विजय शिवतारे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, भीमराव तापकीर, राहुल कुल, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर आदींच्या सभांचा धडाका भाजपकरिता आघाडी देणाऱ्या ठरणार आहेत. तसेच, चंद्रकांत दादा पाटील आणि भाजपच्या राजेश पांडे, निखिल देशपांडे, सुनील ओझा, राजेश आबा शिळीमकर या पथकाने योग्य तो पर्याय समोर ठेवल्याने बारामतीचे मतदार इतिहास घडवण्याच्या तयारीत आहेत, असेही बिडकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)