लोणीत घुमले डॉ. कोल्हेंच्या प्रचाराचे वादळ

हवेली तालुक्‍यात गावभेटीवर जोर : फुलांच्या वर्षावात केले स्वागत

लोणी काळभोर – शिरूर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. शनिवारी हवेली तालुक्‍यात परिर्वतनाचे “वादळ’च डॉ. कोल्हेंच्या प्रचारात गर्दीच्या महापुराच्या रूपाने पाहावयास मिळाले. डॉ. कोल्हे यांच्या प्रचारार्थ हवेली तालुक्‍यात गावभेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, हवेली तालुक्‍याचे ज्येष्ठ नेते माधव काळभोर, प्रताप गायकवाड, विलास काळभोर, नंदुपाटील काळभोर, सनी काळभोर, देवा काळभोर, सूर्यकांत गवळी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-सोलापूर महामार्गावरील गावात व वाडीवस्तीवरील कोपरा सभा, भेटीगाठीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी दिलीप वाल्हेकर, लोचनताई शिवले, कमलेश काळभोर, ऋषी काळभोर, बाबासाहेब काळभोर, प्रितम काळभोर, सुशील काळभोर, राहुल झेंडे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या गावभेट कार्यक्रमात डॉ. कोल्हे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. औक्षण करीत महिलांसह अबालवृद्धांनी हे तुमचे विजयी स्वागत असल्याचे आवर्जून नमूद केले.

डॉ. कोल्हे म्हणाले की, खासदारांकडून ही निवडणूक विकासाच्या प्रश्‍नांपासून भरकटविण्याचा प्रयत्न आता होत आहे. माझ्यावर जे आरोप करण्यात येत आहेत ते हास्यास्पद आहेत. ही निवडणूक विकासाची आहे, जनतेच्या हिताची आहे. तुम्ही 15 वर्षे काय केले? याचा लेखाजोखा मांडण्याची आहे. पुणे -नाशिक रस्त्याच्या रुंदीकरणाची, बैलगाडा शर्यत, आरोग्य विषयक सुविधांची, वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी ही निवडणूक आहे. आता विकासाचे काही मुद्दे नाही आणि ठोस कामेही नाहीत मग काय अशा हीन पातळीवर जाऊन टीकेचे, आरोपाचे राजकारण करणार असाल, तर जनता तुम्हाला माफ करणार नाही. तुम्हाला काय वैयक्तिक टीका करायची ते करा; पण मला विकास महत्त्वाचा आहे, जनतेच्या हिताला सदैव प्राधान्य या नजरेतून मी या निवडणुकीकडे पाहतो. जनता सुज्ञ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.