#CWC2019 : उपांत्यफेरीत इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सनी धुव्वा

बर्मिंगहॅम : सलामीवीर जेसन राॅयच्या ६५ चेंडूत ८५ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्स राखून पराभव करत तब्बल २७ वर्षांनंतर विश्वचषक स्पर्धेत फायनल गाठली आहे. त्यामुळे रविवारी लाॅर्डस मैदानावर क्रिकेटचे  विश्वविजेतेपद मिळविण्यासाठी इंग्लंड-न्यूझीलंड आमनेसामने असतील.

विजयासाठीचे २२४ धावांचे आव्हान इंग्लंडने ३२.१ षटकांत २ गडी गमावत पूर्ण केलं. जेसन राॅयने ६५ चेंडूत ५ षटकार आणि ९ चौकारासह सर्वाधिक ८५ धावा केल्या. जाॅनी बेयर्सटोने ३४ धावा केल्या. तर जो रूटने नाबाद ४९ आणि इआॅन माॅर्गन याने नाबाद ४५ धावा करत इंग्लंडला विजय मिळवून दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स याने प्रत्येकी १ गडी बाद केला. आजच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचं उपांत्य फेरीतील आव्हान संपुष्टात आल आहे.

दरम्यान,  कर्णधार स्टीव स्मिथच्या ८५ आणि अॅलेक्स कैरी याच्या ४६ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर २२४ धावांचे आव्हान ठेवलं होत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाला ४९ षटकांत सर्वबाद २२३ धावसंख्येपर्यतच मजल मारता आली.

ऑस्ट्रेलिया कर्णधार स्टिव स्मिथचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय इंग्लंडच्या गोलंदाजांनी चूकीचा ठरवला, कारण अवघ्या ६ षटकांतच १४ धावांवर आॅस्ट्रेलियाचे सुरूवातीचे ३ फलंदाजांना इंग्लंडच्या गोलंदाजानी माघारी धाडले होते. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या स्टीव स्मिथ आणि कैरी यांनी चौथ्या विकेटसाठी १०३ धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव संभाळला. त्यानंतर मॅक्सवेलने २२ आणि मिचेल स्टार्कने २९ धावा करत संघाच्या धावसंख्येत भर टाकली.

इंग्लंड संघाकडून गोलंदाजीत क्रिस वोक्सने सर्वोत्तम गोलंदाजी करत ८ षटकांत २० धावा देत ३ गडी बाद केले. आदिल रशीदने सुध्दा ३ गडी बाद केले पण त्याने १० षटकांत ५४ धावा दिल्या. याशिवाय जोर्फा आर्चरने १० षटाकांत ३२ धावा देत २ तर मार्क वूडने ९ षटकांत ४५ धावा देत १ गडी बाद केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)