तीन जण जखमी, आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल ः चौघे अटकेत
अकोले – रस्त्याच्या वादातून कळस बुद्रुक येथे दोन गटांत तुंबळ हाणामाऱ्या झाल्याने तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी आठ जणांच्या विरोधात अकोले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी (दि.20) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत अकोले पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, कळस बुद्रुक येथील पुरुषोत्तम भाऊसाहेब वाकचौरे व सतीश काशिनाथ वाकचौरे यांच्यात येण्या-जाण्याच्या रस्त्यावरून नेहमी वाद होत होते. त्यामुळे सदर रस्ता प्रकरण हे तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याकडे सुनावणीसाठी गेले होते.
सुनावणी झाल्यानंतर सतीश वाकचौरे घरी गेल्यावर पुरुषोत्तम भाऊसाहेब वाकचौरे व आशा भाऊसाहेब वाकचौरे यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून तुम्ही तहसीलदारांचे पत्र आणा. तुम्हाला रस्ता घ्या, असे म्हणत पुरुषोत्तम भाऊसाहेब वाकचौरे याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने सतीशच्या कपाळावर घाव घातला.
सतीशला कुऱ्हाड मारून जखमी केले. त्याच वेळी आशा भाऊसाहेब वाकचौरे यांनी सतीश काशिनाथ वाकचौरे, त्यांची पत्नी अनिता व भाऊ बाळासाहेब या सर्वांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच सतीश काशिनाथ वाकचौरे यांच्या घराची खिडकीची काच फोडून नुकसान केले. याबाबत सतीश वाकचौरे यांनी अकोले पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून वरील आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरुषोत्तम भाऊसाहेब वाकचौरे, रामभाऊ एकनाथ वाकचौरे, एकनाथ बबन वाकचौरे, भाऊसाहेब बबन वाकचौरे या चार जणांना अटक करण्यात आली. चारही जणांना न्यायालयात उभे केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. इतर चार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू असून, त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.