“स्वयंरोजगारातून महिलांनी पुढाकार घ्यावा’

राहुरी – महिला सक्षम झाली तर संपूर्ण कुटुंब उभे राहू शकते. त्यासाठी महिलांनी पुढाकार घेऊन स्वयंरोजगाराच्या माध्यमातून प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, असे मत नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी व्यक्त केले. महिला आर्थिक विकास महामंडळच्या प्रतिभा लोकसंचलीत साधन केंद्राच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर डॉ. चेतन लोखंडे, अशोक थोरे, जिल्हा व्यवस्थापक संजय गर्जे, सुनील पैठणे, देवळाली प्रवराचे प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी, राहुरीचे बी.के. राऊत, स्वाती निरगुडकर, सविता हारदे, वर्षा पाठक, बॅंक अधिकारी अनंत ढोले, केंद्राच्या अध्यक्ष पुष्पा धनवटे, कार्यालयीन अधीक्षक बन्सी वाळके आदी उपस्थित होते.

नगराध्यक्ष सत्यजित कदम पुढे म्हणाले, देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्यावतीने महिला सबलीकरण व सक्षमीकरणासाठी सातत्याने पुढाकार घेतला जात आहे. महिलांनी पुढे येऊन व्यवसाय करावयाचे ठरविल्यास नगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करील. यावेळी जिल्हा व्यवस्थापक संजय गर्जे यांनी महिलांना मार्गदर्शन व शंकाचे निरसन केले. यावेळी डॉ. चेतन लोखंडे, पुष्पा धनवटे, अनंत ढोले, सुनील पैठणे, सुनील गोसावी, स्वाती निरगुडकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी विविध बचत गटांच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा नगराध्यक्ष कदम व मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सहयोगीनी, वस्तीस्तर संघ पदाधिकारी यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचलन आप्पा ढोकणे यांनी, तर व्यवस्थापक महेश आबुज यांनी आभार मानले.

यावेळी श्रीरामपूर, देवळाली प्रवरा व राहुरी नगरपालिकेमधील दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातील बचतगट व ग्रामीण भागातील शेकडो महिला उपस्थित होत्या. बचतगटाने उत्पादित केलेल्या वस्तू प्रदर्शनाला नगराध्यक्ष सत्यजित कदम व मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा लोकसंचलीत साधन केंद्राच्या सहयोगीनी व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)