पिंपरी – कर्जाचे पाच लाख रुपये परत केल्यानंतरही उरलेल्या अवघ्या दहा ते अकरा हजारांसाठी कर्ज देणाऱ्या आरोपीने कर्ज घेणाऱ्या इसमाच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना नेरे, दत्तवाडी येथे घडली. याप्रकरणी 36 वर्षीय इसमाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अरुण शिवाजी जाधव (वय, 28 रा. निरनिमगाव, ता. इंदापूर) या तरुणास हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, पोलिसांनी तपास करुन अपहरण झालेल्या मुलाला कुटुंबियांच्या ताब्यात दिले आहे.
ही घटना मंगळवारी (दि. 7) सकाळी नऊच्या सुमारास मुळशीतील नेरे, दत्तवाडी येथे घडली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरुण आणि फिर्यादी हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात पैशांचा व्यवहार झाला होता. मंगळवारी सकाळी फिर्यादी यांनी आरोपी अरुण यास कर्जाचे सर्व पाच लाख रुपये परत केले. पाच लाख रुपये घेऊनही अजून दहा ते अकरा हजार रुपये राहिले असल्याचे अरुण याने फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांनी उर्वरित रक्कम थोड्या दिवसांनी देतो असे सांगितले आणि ते कामावर निघून गेले. फिर्यादी पैसे न देता निघून गेल्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी यांच्या पंधरा वर्षीय मुलाला फूस लावून पळवून नेले. मात्र पोलिसांनी तात्काळ हालचाली करत आरोपीला अटक करून मुलाची सुटका केली.