हातात शस्त्रे घेऊन चार ते पाचजणांनी केली कार्यालयाची तोडफोड : तोडफोडीनंतर साने चौकात तणाव
माझे कोणाशीही राजकीय वैमनस्य नाही, मात्र राष्ट्रवादीच्या काल झालेल्या बैठकीत माझे नाव भोसरी विधानसभेसाठी चर्चेत आले आहे. त्या पार्श्वभूमीवर दहशत माजवण्यासाठी हा सशस्त्र हल्ला घडवून आणल्याचा मला संशय आहे. हल्लेखोरांचा पोलिसांनी लवकर शोध घेवून हल्ल्यामागे नेमका कोणता उद्देश आहे याचा तपास करावा. हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले असून लवकरात लवकर आरोपींना पोलिसांनी अटक करावी.
– दत्ता साने, विरोधी पक्ष नेता, राष्ट्रवादी
पिंपरी – महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयात घुसून चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी साहित्याची मोडतोड केली. हातात तलवार व शस्त्रे घेवून हा हल्ला केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हल्ला झाला त्यावेळी कार्यालयात दोन महिला उपस्थित होत्या. यावेळी एक महिला काच लागल्याने किरकोळ जखमी झाली. ही घटना आज शुक्रवारी (दि. 7) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास साने चौक परिसरातील साने कार्यालयात घडली.
महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे जनसंपर्क कार्यालय साने चौक येथे आहे. दुपारी साडेचारच्या सुमारास हातात शस्त्रे घेतलेल्या चार ते पाच तरुणांच्या टोळक्याने कार्यालयावर हल्ला चढविला. यावेळी साने कार्यालयात नव्हते. कामानिमित्त आलेल्या दोन महिला कार्यालयात बसल्या होत्या. तोंडावर रुमाल बांधून हातात तलवारी व शस्त्रे घेवून आलेल्या हल्लेखोरांनी कार्यालयामधील, संगणक, फर्निचर व टेबलची मोडतोड केली. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या दोन महिलांमधील एका महिलेला काच लागल्याने सदर महिला किरकोळ जखमी झाली आहे. अचानकपणे हल्ला करून तोडफोड केल्यानंतर हे टोळके कार्यालयातून पळून गेले. दरम्यान हल्ल्याची माहिती कळता साने यांचे शेकडो समर्थक घटनास्थळी जमा झाले होते.
माहिती मिळताच चिखली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. पोलिसांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले असून हल्लेखोरांची माहिती घेण्यात येत आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी, नगरसेवक राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले यांच्यासह अनेक नगरसेवक व कार्यकर्त्यांनी साने यांच्या कार्यालयाकडे धाव घेत झाल्या प्रकाराची माहिती घेतली. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती. कार्यालयावर झालेला हल्ला सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून चार ते पाचजण दुचाकीवरुन तोंडाला रुमाल बांधून आल्याचे दिसत आहेत.