खडकीत दोन, बोपोडीत एका घराची भिंत कोसळली

पावसाने झोडपले ः पाणी साचून जनजीवन विस्कळीत

खडकी – मागील चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे खडकी बोपोडी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खडकी परिसरात दोन ठिकाणी तर बोपोडी परिसरात एक ठिकाणी घराची भिंत कोसळण्याची घटना आज (सोमवारी) घडली. तसेच काही ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटना ही घडल्या आहेत.

मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे आज सकाळी साडेदहा वाजता खडकी दर्जिगल्ली व कसाई मोहल्ला येथील घरांच्या भिंती कोसळल्या. सुदैवाने या घटनेत कुठलीच हानी झाली नाही. महादेव वाडी साईबाबा मंदिर परिसरातील एक जुना वृक्ष सिमा भिंतीवर कोसळला. मंदिरात देवदर्शन घेण्याकरिता आलेले विजय बेल्हेकर यांनी तातडीने या प्रकरणी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड अग्निशामक दलास व उद्यान अधिक्षक विभागास माहिती कळवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील नेहरु उद्यान तसेच किर्लोस्कर कंपनी समोर काही झाडांच्या फांद्या कोसळल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. बोपोडीत मुंबई-पुणे रस्त्यालगत आगरवाल धर्म शाळेशेजारील एका धोकादायक इमारतीतील काही भिंतीना तडा जावून काही भाग ढासळला.

भाऊ पाटील रोड तसेच आंबेडकर चौकात पावसामुळे पाण्याचे तळे साचले आहे. रेल्वे पुलाखाली तसेच सब वे येथे ही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत होती. खडकी पोलीस स्टेशन शेजारील रेल्वे पुला खाली साचलेल्या पाण्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार घडले. कॅंन्टोन्मेंट बोर्डाने लाखो रुपये खर्च करुण रेल्वे पुलाखाली पाणी साचू नये म्हणून सिमेंट कॉंक्रीटच्या जाळ्या बसविण्यात आल्या. मात्र त्या खचल्याने दुचाकी घसरल्या. फुगेवाडी येथील पठाण चाळीतील घरात भुयारी चेंबर्सचे पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)