पिंपरी – दारुच्या नशेत एकाने आपल्याच बालपणीच्या मित्राचा खून केला. दिवसभर दोघे सोबत होते, दारु पिले, मौज-मजा केली आणि मग एकमेकांना दगड मारु लागले. दगड मारता-मारता एक मित्र दुसऱ्या मित्राच्या अंगावर बसला आणि त्याला दगडाने ठेचून मारुन टाकले. ही घटना आज (दि.16) सकाळी चिखली परिसरात उघडकीस आली.
सनी घाटोळकर (वय, 22) असे मयताचे नाव असून प्रतीक उर्फ सोन्या संजय मोरे (वय, 20) असे आरोपीचे नाव आहे. दोघांवरही वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शुभम घाटोळकर याने चिखली पोलिसात फिर्याद दिली आहे. आरोपीचा शोध चिखली पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सनी घाटोळकर आणि आरोपी मित्र प्रतीक उर्फ सोन्या संजय मोरे हे दोघे बालपणीचे मित्र होते. बुधवारी ते दिवसभर सोबत फिरत होते. रात्री देखील सोबत दारू प्यायले. दारुची नशा चांगलीच चढल्यानंतर दोघे शरदनगर येथील गल्लीत आले. येथे दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. दोघे एकमेकांना दगड मारत होते. यानंतर, हा वाद एवढा विकोपाला गेला की, प्रतीक हा सनीच्या अंगावर बसला आणि त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. चिखली पोलीस प्रतीकचा शोध घेत आहेत.