पुण्यात 52 टक्के तर बारामतीमध्ये 61 टक्के मतदान

पुणे व बारामतीमध्ये शांततेत मतदान : जिल्हा प्रशासनाची माहिती

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघातील 31 तर बारामती लोकसभा मतदारसंघातील 18 उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी मतदानयंत्रात बंद झाले. पुणे लोकसभा मतदारसंघात 52 टक्के तर बारामती मतदारसंघात 61 टक्के मतदान झाले. दोन्ही मतदारसंघातील 4 हजार 369 मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह उपस्थित होत्या. पुणे लोकसभा मतदारसंघात 20 लाख 74 हजार 861, तर बारामतीत 21 लाख 12 हजार 408 मतदार आहेत.

पुणे लोकसभा मतदारसंघात वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरुड, पर्वती , पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. शहरात मतदान सुरू झाल्यानंतर मतदान केंद्रांवर सकाळी गर्दी असल्याचे दिसून आले. तर दुपारी मतदान केंद्रांवर गर्दी कमी असल्याचे दिसून आले. सकाळी 7 ते 9 पर्यंत या पहिल्या दोन तासांत पुणे लोकसभा मतदारसंघात 8.71 टक्के मतदान झाले होते. तर बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. बारामती मतदारसंघातही सकाळी तुरळक गर्दी होती. त्यानंतर दुपारच्या सत्रात ग्रामीण भागातील मतदान केंद्रांवर गर्दी झाली होती. बारामती मतदारसंघात पहिल्या दोन तासात 6.01 टक्के मतदान झाले. पहिल्या दोन तासात शहरात सर्वाधिक मतदान शिवाजीनगर मतदारसंघात झाले, याठिकाणी सुमारे 12 टक्के मतदान झाले होते. तर बारामती मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत सुमारे 11 टक्के मतदान झाले होते.

बारामती लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने ग्रामीण भागाचा समावेश होतो. या मतदारसंघात ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले. त्याचबरोबर महिला मतदारांची संख्याही लक्षणीय होती. ग्रामीण भागात भरउन्हातही मतदान केंद्रांवर गर्दी होती. पुणे लोकसभा मतदारसंघात पाचवाजेपर्यंत 43.04 टक्के तर बारामती लोकसभा मतदारसंघात 5 वाजेपर्यंत 51.99 टक्के मतदान झाले होते.

मतदानाची वेळ संपेपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत रांगेत असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येतो. त्यानुसार पुणे लोकसभा मतदारसंघातील सुमारे 45 मतदान केंद्रे रात्री सात ते साडेसात पर्यंत सुरू होती, अशी माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली.

पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदान करण्यास सुरुवात झाली. त्यापूर्वी एक तास आधी म्हणजे सहा वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रांवर मॉक पोल (मतदान यंत्र चाचणी) घेण्यात आली. यावेळी ज्या मशीनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली. तसेच मशीन बंद असल्याचे निदर्शनास आले त्या ठिकाणच्या मशीन मतदानाच्या आधी बदलण्यात आल्या. सर्व मतदान केंद्रांमध्ये वेळेवर मतदान सुरू झाले. दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघात बॅलेट युनिट 13, कंट्रोल युनिट 16 आणि व्हीव्हीपॅट 37 अशी एकूण 66 यंत्रे बदलण्यात आली. तर बारामती लोकसभा मतदारसंघात 19 बॅलेट युनिट, 19 कंट्रोल युनिट तर 30 व्हीव्हीपॅट अशी एकूण 68 यंत्रे बदलण्यात आली आहे. ज्या मतदान केंद्रावरील मशीनमध्ये बिघाड झाला, त्या ठिकाणची मतदान यंत्रे सुमारे 10 ते 35 मिनिटांत बदलण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

2014 लोकसभा निवडणूक
लोकसभा मतदारसंघ – मतदानाची टक्केवारी
पुणे – 2014 – 54.11 टक्के
बारामती – 2014 – 58.81 टक्के


2019 लोकसभा निवडणूक
लोकसभा मतदारसंघ – मतदानाची टक्केवारी
पुणे – 52 टक्के
बारामती – 61 टक्के

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)