यंदा 300 कोटी लिटर पाणी साठविणार

जिल्हा दुष्काळमुक्‍त अभियानात बीजेएस, फिरोदिया, बोरा ट्रस्टचा पुढाकार

नगर – या वर्षी महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ आहे. राज्य शासनाने तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. अहमदनगर जिल्हा हा देखील दुष्काळाच्या छायेमध्ये आहे. भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) राज्य शासनाबरोबर करार करून अहमदनगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. श्री. फिरोदिया ट्‍रस्ट व श्री. मुलतानचंद बोरा ट्‍रस्ट या दोन्ही ट्रस्टच्या सहकार्याने 45 दिवसांमध्ये 30 लाख क्‍युबिक मीटर पेक्षा जास्त गाळ काढण्याचे कार्य या जिल्ह्यात केले जाणार आहे. त्यामुळे 100 मशीन्सच्या साहाय्याने 300 कोटी लिटर पाणी साठविण्याची क्षमता वाढणार आहे, सदर गाळ तेथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर पसरविल्यामुळे 6000 एकर जमीन सुपीक होईल. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने हे काम 45 दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे आव्हान बीजेएसने स्वीकारले आहे.

या संपूर्ण कार्याची प्रोग्राम मॅनेजमेंट बीजेएस करणार असून फिरोदिया ट्रस्ट व मुलतानचंद बोरा ट्रस्ट यांच्या वतीने मशीन्स उपलब्ध करून दिल्या जातील. राज्य शासनाच्या वतीने डिझेल पुरविण्याची व्यवस्था केली जाणार आहे व शेतकरी स्वखर्चाने गाळ त्यांच्या शेतावर पसरविण्यासाठी घेवून जाणार आहेत. यावर्षीच्या तीव्र दुष्काळाच्या झळा ज्याप्रकारे शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहेत, त्यातून मार्ग काढण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. बीजेएसने अहमदनगर जिल्ह्याचे प्रकल्प प्रमुख आदेश चंगेडीया यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य कार्यालयातून अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यासाठी तालुका समन्वयकाची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व तलावांची पाहणी करून सरपंच व गावकऱ्यांची बैठक घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने या यादीस मान्यता देण्यात आली आहे.

आज रोजी 13गावांमध्ये प्रत्यक्ष काम सुरू आहे व 15 जूनपर्यंत निर्धारित कार्य पूर्ण केले जाणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व विश्‍वजीत माने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन या कामी लाभत आहे. भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) अहमदनगर जिल्ह्यातील 10 तालुक्‍यांमध्ये अंदाजे 329 गावांमध्ये 350 तलावांच्या क्षेत्र भेटी तालुका समन्वयक यांच्या मार्फत केलेल्या आहेत. त्यापैकी 122 तलावांमधून गाळ काढण्याचा भारतीय जैन संघटनेचा (बीजेएस) मानस आहे.

तालुक्‍यातील गुंडेगाव येथे असलेल्या पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रोहिणी नऱ्हे अप्पर तहसीलदार नगरबाळासाहेब हराळ- जिल्हा परिषद सदस्य, अ.नगर संजयकुमार कोतकर उपसरपंच गुंडेगाव, आदेशजी चंगेडिया जिल्हा प्रकल्प प्रमुख अहमदनगर, भारतीय जैन संघटना, प्रशांत गांधी – नगर तालुका प्रकल्प अध्यक्ष, बीजेएस वरील मान्यवरांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा दुष्काळ मुक्त अभियान या अंतर्गत प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी गीते बाबासाहेब- तालुका समन्वयक, नगर बीजेएस, उद्धव खेडकर- तालुका समन्वयक, नगर बीजेएस गावचे ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, तलाठी गौडा भाऊसाहेब, मंडल अधिकारी झाडे, सुनील भापकर, हनुमंत कुताळ, मंगेश हराळ, शिवनाथ कोतकर, वसंत भापकर, बबनराव हराळ, वामनराव जाधव, दशरथ जावळे, काशिनाथ सोनवणे, संतोष भापकर व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)