भुताटकी, की माननीयांनी केला प्रकार?
तक्रारीनंतर पूर्ववत ठेवण्यता आल्या टपऱ्या
पुणे – महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून रस्त्याची कामे केली आणि पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता यावे यासाठी मोठेच्या मोठे फुटपाथही केले. परंतु या फुटपाथवर एका रात्रीतून जर टपऱ्या उभारल्या आणि सकाळी पादचाऱ्यांना आणि तेथील आजूबाजूच्यांना आश्चर्यचकित करण्याचा प्रकार शुक्रवार पेठेत घडला. ही जादू कोणत्या माननीयांनी केली याचा शोध सुरू असला, तरी महापालिका प्रशासनालाही याबाबत माहिती नव्हती. त्यांना गृहित धरून हा प्रकार केल्याचे उघडकीला आले. मात्र महापालिकेकडे तक्रार केल्यानंतर दुपारी चार वाजता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या टपऱ्या उचलून होत्या त्या ठिकाणी पूर्ववत ठेवल्या.
मुळात फुटपाथ हे चालण्यासाठी आहेत. हॉकर्स पॉलिसीमध्ये महापालिकेने काही नियम केले आहेत. तिची अंमलबजावणी झाली नसली तरी काही नियमांच्या अधीन राहून त्याची अंमलबजावणी केली जात आहे.
माडिवाले कॉलनीतील सुभाषनगर मधील वाडिया रुग्णालयाच्या गेटजवळ या टपऱ्या होत्या. नागरिक अनेक कामे घेऊन नगरसेवकांकडे खेटा मारतात. 10 वेळा खेटा मारल्यानंतर कुठे जाऊन त्यांचे काम होते. परंतु “स्मार्ट फुटपाथ’वर दुकाने हलवण्याची किमया मात्र एका रात्रीत करून “स्मार्ट वर्क’ दाखवण्यात आले.
याबाबत स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार करण्यात आली. त्यावेळी हेमंत रासने आणि राजेश येनपुरे यांनी याठिकाणांना भेट दिली. परंतु त्यांनीही याबाबत आश्चर्य व्यक्त केले. मात्र वस्तुस्थितीची भान आल्याने त्यांनी याबाबत महापालिकेच्या संबंधित विभागांना कळवण्याचे आश्वासन तक्रारदार रहिवाशांना दिले. त्यानुसार त्यांनी प्रशासनाकडे तक्रार दिली. आणि या टपऱ्या काही तासातच जेथून उचलल्या तेथे नेऊन ठेवण्यात आल्या.