पिंपरी – फसवणुकीच्या प्रकरणात तक्रारदाराकडून 25 हजारांची लाच घेताना मिलन कुरकुटे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहात अटक केली होती. दरम्यान मंगळवारी त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
मिलन शंतनू कुरकुटे असे अटक केलेल्या लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये बॅंकेच्या अधिकाऱ्यांनाही आरोपी करावे, अशी तक्रारदाराची मागणी होती. या गुन्ह्याचा तपास अधिकारी उपनिरीक्षक मिलन कुरकुटे याने तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांची मागणी केली.
यातील 25 हजार रुपये घेताना शनिवारी त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याला मंगळवारी (दि. 28) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.