सरपंच पदाचे आरक्षण अद्याप जाहीर नाही
कामशेत – खडकाळा ग्रुप ग्रामपंचायतीचे वार्डनिहाय आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले. निवडणूक अधिकारी बी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात आरक्षण सोडतीसाठी बैठक घेण्यात आली. एकूण सहा वार्डसाठी 17 सदस्य पदाचे आरक्षण काढण्यात आले. सरपंच पदाचे आरक्षण होणे बाकी असले तरी या सोडतीनुसार ग्रामपंचायतीवर महिलांचे वर्चस्व असेल असे चित्र आहे.
या बैठकीला मंडल अधिकारी मुकूंद खोमणे, गावकामगार तलाठी योगेश वाघ, ग्रामविकास अधिकारी प्रताप माने, सरपंच रूपाली शिनगारे, उपसरपंच संतोष कदम, माजी सभापती राजाराम शिंदे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक माऊली शिंदे, आनंद टाटिया, आभिमन्यू शिंदे, गणपत शिंदे उपस्थित होते. वार्ड क्रमांक 1 मध्ये एकूण 3 जागा असून अनुक्रमे अनुसूचित जाती महिला, सर्व साधारण महिला, सर्वसाधारण पदासाठी हे आरक्षण आहे. भीमनगर खामशेत, एचडीएफसी बॅंकचा मागचा भाग, शिवाजी चौक या भागाचा या वॉर्डात समावेश आहे.
वार्ड क्रमांक 2 मध्ये एकूण तीन जागा असून, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण गटाचे आरक्षण आहे. लोणावळा सहकारी बॅंक ते पंडित नेहरू विद्यालय इंदिरा आवास, महालक्ष्मी मंदिर, बाजारपेठेतील जिल्हा परिषद शाळाचा परिसर या वॉर्डात येतो.
वार्ड क्रमांक 3 एकूण दोन जागा आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्व साधारण महिलेसाठी आरक्षण आहे. आदर्श कॉलनी, गणेश मंगल कार्यालय, ग्रामपंचायत व खरेदी-विक्री संघ हा भाग येथे आहे. वार्ड क्रमांक 4 एकूण तीन जागा असून, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला, सर्व साधारण हे आरक्षण आहे. गावठाण, माऊलीनगर, बंगला कॉलनी या वॉर्डात आहे.
वार्ड क्रमांक 5 मध्ये एकूण तीन जागा असून, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिलासाठी आरक्षण आहे. दत्त कॉलनी, सहारा कॉलनी, देवराम कॉलनी या भागात येतात. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये अनुसूचित जाती पुरुष, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण आशा तीन जागा आहेत. इंद्रायणी कॉलनी, पंचशील कॉलनी आदी भाग यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. सरपंच पदाची सोडत झाली नसल्याने याबद्दल उत्कंठा अजून जागृत आहे, तर ही सोडत लवकरात लवकर व्हावी, अशी इच्छा इच्छुक तरुण व्यक्त करताना दिसत आहे.