- एका वर्षात तपासणी पथकाची कामगिरी
- 15 दिवसांत अहवाल पाठवण्याच्या सूचना
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त बंधनकारक असतानाही अनेक कर्मचारी कार्यालयात उशिरा येत असल्याचे दिसून आले. त्यानूसार महापालिकेच्या तपासणी पथकाने केलेल्या कारवाईत एका वर्षात तब्बल 4 हजार 126 लेटलतीफ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केल्याचा अहवाल 15 दिवसात पाठवण्याचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.
उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने ई-मस्टर प्रणालीमध्ये बायोमेट्रीक हजेरीच्या माध्यमातून वेतन ठरवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे काही अधिकारी वगळता कर्मचाऱ्यांचे कार्यालयात उशिरा येण्याचे प्रमाण घटले आहे. या प्रणालीमुळे खोटी उपस्थिती लावण्याच्या प्रकाराला आळा बसला आहे. आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हजेरीतील समस्येचे निवारण करुन ई-मस्टर प्रणालीमध्ये किरकोळ अधिकारी वगळता सर्व कर्मचाऱ्यांची नोंद झालेली आहे. ही प्रणाली अंमलात आणल्यामुळे प्रत्यक्ष कर्मचाऱ्याला आपल्या कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील बांधकाम, आरोग्य, वैद्यकीय, पाणी पुरवठा, स्थापत्य, विद्युत, लेखा आणि मुख्य लेखा, मध्यवर्ती भांडार, नगररचना, सुरक्षा, क्रीडा, करसंकलन, वायसीएम, जिजामाता, तालेरा, आकुर्डी, सांगवी रुग्णालये, दवाखाने, यासह क, ब, ई, आणि ह क्षेत्रीय कार्यालयात देखील लेटलतीफ कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांवर तपासणी पथकाने करडी नजर ठेवून ही कार्यवाही केली आहे. महापालिकेतील अनेक विभागातील कामकाजामध्ये कर्मचारी व अधिकारी कामचुकारपणा करतात.
कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी दुपारनंतर त्यांच्या कक्षात दिसत नाहीत. अनेक जण कार्यालयात कमी आणि उपहारगृह व इतर ठिकाणी बसून असतात. तपासणी पथकांच्या माध्यमातून अनेक विभागाची पाहणी करुन कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना नैमित्तिक रजा, अर्जित रजा, अर्धपगारी रजा देण्यात येते. त्यातील किरकोळ आणि अर्जित रजा खतवून कार्यवाही सुरु केलेली आहे.