पुणे : शहरातील करोनाची स्थिती दिवसें दिवस गंभीर होत असून प्रत्येक पुणेकराचा जीव वाचविण्यासाठी पुणे शहरावर वैयक्तिक लक्ष द्यावे अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच शहरासाठी कमी पडणारा ऑक्सिजनही तातडीनं उपलब्ध करून पुणेकरांचे जीव वाचवावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बागूल म्हणाले की, फेब्रुवारी 2021 पासून पुणे शहरामध्ये कोविड 19 रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामध्ये दैनंदिन 6 हजार रूग्णांची भर पडत आहे. पुणे शहरात कोरोना बाधितांची संख्या सुमारे 50 ते 55 हजारापर्यंत पोहोचली आहे. कोरोना बाधितांची ऑक्सिजन पातळी कमी झाली की त्यांना ऑक्सिजन पुरविणे क्रमप्राप्त ठरते. पुणे महापालिका हददीमध्ये दैनंदनि 300 मे.टन ऑक्सिजनचा पुरवठा होत असून त्यापैकी 250 मे.टन ऑक्सिजनचा पुरवरा हा खाजगी रूग्णालयांना होत आहे. उर्वरित 50 मे.टन ऑक्सिजनचा पुरवठा हा पुणे मनपाच्या रूग्णालयांना होत आहे. महापालिकेच्या रूग्णालयातील रूग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यु होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
भविष्यात अजून परिस्थिती वाईट होणार असून रस्त्यावर ऑक्सिजन अभावी मृत्यु होतील. तर पुणे महापालिकेच्या रूग्णालयात तुलनेले गोरगरीब नागरिक दाखल होतात, त्यांचेवरील उपचारासाठी व प्रत्येक पुणेकराचा जीव वाचविण्यासाठी आपण पुणे शहरावर वैयक्तिक लक्ष घालावे अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. – आबा बागूल ( कॉंग्रेस गटनेता)