2021 असणार सर्वात उष्ण वर्ष; पर्यावरणतज्ज्ञांची माहिती

वॉशिंग्टन – पर्यावरणात कार्बन डाय ऑक्‍साईडच्या उत्सर्जनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याने 2021 हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरण्याचा इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे.
याबाबत करण्यात आलेल्या एका संशोधनात अशी बाब समोर आली आहे की गेल्या तीनशे वर्षांच्या कालावधीमध्ये पर्यावरणातील कार्बन-डाय-ऑक्‍साइडच्या उत्सर्जनाची पातळी 50 टक्केपेक्षा जास्त वाढली आहे. अठराव्या शतकामध्ये कार्बन-डाय-ऑक्‍साइडची जी पातळी होती त्याच्यापेक्षा दीडपट जास्त पातळी सध्या पर्यावरणामध्ये कार्बन-डाय-ऑक्‍साइडची असणार आहे.

ब्रिटन आणि अमेरिकेतील काही संशोधकांनी नुकतीच बर्फाळ प्रदेशात कार्बन-डाय-ऑक्‍साइडचे पातळीचे संशोधन केले. इसवी सन सतराशे पन्नास ते अठराशे या कालावधीमध्ये कार्बन-डाय-ऑक्‍साइडचे प्रमाण प्रति मिलियन 278 पार्टस्‌ एवढे होते. मार्च 2021 मधीलकार्बन डाय ऑक्‍साईडची पर्यावरणातील पातळी प्रति मिलियन 417 . 14 पार्टपर्यंत पोहोचली आहे. मे महिन्यापर्यंत कार्बन डाय ऑक्‍साईडचे उत्सर्जनात आणखीनच वाढ होणार असून पातळी प्रति मिलियन 419.5 पार्टसपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्‍त होत आहे.

लंडन विद्यापीठातील प्रोफेसर सायमन लुइस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पर्यावरणातील कार्बन-डाय-ऑक्‍साइडची पातळी 25% वाढण्यासाठी दोनशे वर्षे लागली. त्यानंतर केवळ तीस वर्षांमध्येच ही पातळी 50 टक्‍क्‍यापेक्षा जास्त झाली. या सर्व कारणांमुळे 2021 हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष असण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.