एडनबर्ग – झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-20 सामन्यात झिम्बाब्वेने स्कॉटलंडवर रोमांचक विजय मिळविला आहे. या सामन्यात झिम्बाब्वे संघाने स्कॉटलंड संघाला 10 धावांनी पराभूत करत मालिकेत 1-1 अशी बरोबरीत साधली आहे.
या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु सलामीवीर झटपट बाद झाल्याने झिम्बाब्वेची निराशाजनक सुरुवात झाली. त्यानंतर सीन विलियम्सने 52 चेंडूंमध्ये नाबाद 60 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 5 चौकार आणि 1 षटकार ठोकला. तर कर्णधार क्रेग एर्विननेदेखील 30 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने 20 षटकांत 5 बाद 136 धावांपर्यत मजल मारली.
निर्धारित धावांचा पाठलाग करताना स्कॉटलंड संघाचे सलामीवीर संघाला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाहीत. जॉर्ज मुंसी 9, तर कायल कोएटजर अवघ्या 2 धावा करत माघारी परतला. खराब सुरुवात मिळाल्यानंतर स्कॉटलंड संघ बॅकफूटवर होता. परंतु बेरींगटनच्या 42 धावांच्या खेळीमुळे स्कॉटलंडने पुन्हा एकदा सामन्यात पुनरागमन केले. तर शेवटीस क्रॉसने 42 आणि लिस्कने 25 धावांची खेळी केली. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे स्कॉटलंड संघाचा डाव 19.4 षटकात 126 धावांवर संपुष्टात आला.
हा सामना शेवटच्या षटकात पालटला. या अंतिम षटकात स्कॉटलंडला विजयासाठी 13 धावांची गरज होती. परंतु षटकातील पहिल्याच चेंडूवर शरीफ 2 धावा करत माघारी परतला. त्यानंतर षटकातील दुसऱ्या चेंडूवर वॅट भोपळाही न फोडता धावबाद झाला. तिसऱ्या चेंडूवर लिस्क बाद होऊन माघारी परतला. तर चौथ्या चेंडूवर एवंस देखील धावबाद होऊन माघारी परतला.