विधानसभेच्या हालचाली ठरविणार झेडपीच्या निवडी

राजकीय घडामोडींना वेग; इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या पोटात गोळा

सातारा – लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांच्या हालचालींचा वेग वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्याचे पडसाद आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिसणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे निवडणुकीच्या निकालाचा मोठा परिणाम जिल्ह्यातील प्रमुख सत्ता केंद्रांपैकी जिल्हा परिषदेवर होणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या चित्रावरच जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत 21 सप्टेंबर रोजी संपुष्टात येत आहे. मात्र, निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जून महिन्याच्या अखेरीपर्यंत निघणार आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीनंतरच नूतन अध्यक्षांची आणि विषय समिती सभापतींची निवड होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्या जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसून येत आहेत. कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचे भाजप- सेनेत प्रवेश होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषत: राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजप- सेनेत प्रवेश झाला तर त्याचा मोठा परिणाम जिल्हा परिषदेवर होणार आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्याचा देखील भाजप- सेनेत प्रवेश झाला तरीही जिल्हा परिषदेवर परिणाम होणार आहे.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे. 64 सदस्य संख्येपैकी 40 सदस्य राष्ट्रवादीकडून निवडून आले आहेत. तर भाजप आणि सेनेकडून प्रत्येकी सात सदस्य निवडून आले आहेत. खासदार उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीचे तीन, माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर गटाचे तीन, शिवसेनेसह पाटण विकास आघाडीचे तीन असे जिल्हा परिषदेतील बलाबल आहे. अशा स्थितीत सध्या जिल्ह्यात राजे विरूध्द राजे संघर्ष टोकाला पोहचला आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपकडून माढयाचे खासदार झाले आहेत. निंबाळकरांची आमदार जयकुमार गोरे यांना साथ देताना दिसून येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अनेकांचे भाजप- शिवसेनेत प्रवेश होण्याचे संकेत समोर येत आहेत. या सर्व घडामोडींचा परिणाम जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकारी निवडीवर होण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. त्यामुळे येत्या महिन्याभरात होणाऱ्या राजकीय हालचाली कशा होतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे राहणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.