इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आसिफ अली झरदरी यांच्या कन्येला पोलिसांकडूनच धक्काबुक्की झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. तुरुंगात असलेले झरदारी यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात भेटायला त्यांची कन्या आसिफा गेली असताना हा प्रकार घडला. मात्र पोलिसांनी ही भेट होऊ दिली नाही. आसिफा यांना रुग्णालयात जाऊ दिले नाही.
झरदारी गंभीर आजारी असतानाही त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले, असा आरोप झरदारी यांचे पुत्र आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार झरदारी यांना योग्य वैद्यकीय उपचार देत नसल्याचा आरोपही बिलावल भुट्टो यांनी केला आहे.
आसिफा झरदारी यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये धक्काबुक्कीच्या प्रसंबाबत सांगितले. आपल्या वडिलांची प्रकृती खूपच खालावलेली असल्याने त्यांना रुग्णालयातच ठेवणे आवश्यक आहे. त्यांना अधिक उपचार आणि तपासण्यांची आवश्यकता आहे. त्यांच्या हृदयाच्या तीन प्रमुख रक्तवाहिन्या पूर्णपणे बंद झाल्या आहेत. त्यांना उपचार नाकारणे म्हणजे मानवाधिकार आणि न्याय नाकारणे. हे राजकीय सूड नाट्य आहे, असे त्या म्हणाल्या.
झरदारी यांन भेटायला गेले असता हॉस्पिटलचे दरवाजे बंद करण्यात आले होते. कोणाही रुग्णांना आत किंवा बाहेर दिले जात नव्हते. आत घुसल्यावर जिन्यावर आणि लिफ्टजवळ आपल्याला पोलिसांनी आडवले. पोलिसांनी मानवी साखळीच केली होती. पोलिसांनी आपल्याला अडवले, ढकलले आणि धक्काबुक्कीही केली, असेही त्या म्हणाल्या.
सरकारने झरदारी यांच्या हत्येचा कट केला असल्याचा आरोप बिलावल भुट्टो यांनी केला आहे. झरदारी यांच्याबाबत काही बरेवाईट झाल्यास इम्रान खान यांच्या सरकारला जबाबदार धरले जाईल, असे माजी पंतप्रधन रझा परवेझ अशर्रफ यांनी म्हटले अहे.