भविष्यात वंचितकडे विरोधी पक्षनेतेपद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राष्ट्रवादी पक्ष आता केवळ काही जिल्ह्यांपुरता मर्यादीत

नांदेड – शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आता केवळ काही जिल्ह्यांपुरता मर्यादीत राहिला आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच भविष्यात वंचित बहुजन आघाडी विरोधी पक्षात असेल, असे भाकीतही मुख्यमंत्र्यांनी वर्तवले.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा नांदेडमध्ये पोहोचली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली आहे. विधानसभा निवडणुकीतही आघाडीसोबत युती न करता वंचित स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. सध्याची परिस्थिती पाहिली तर ही बी टीम आता ए टीम बनली आहे. आगामी काळात राज्याचे विरोधी पक्षनेते पद हे वंचित आघाडीकडे असेल, असे ते म्हणाले.

राष्ट्रवादीतून सुरु असलेल्या आऊटगोईंगवर मुख्यमंत्री म्हणाले, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष फक्त महाराष्ट्रापुरता होता. त्यातही पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र आता राष्ट्रवादी कॉंग्रेस केवळ काही जिल्ह्यांपुरती मर्यादित राहिली आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, अशी चर्चा सध्या जोर धरु लागली आहे. त्यात शिवसेना नेते, आमदार अनिल परब यांनी राज्याचा आगामी मुख्यमंत्री वरळी मतदारसंघातून असेल असे वक्तव्य केले. यावर विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिप्रश्न उपस्थित करत परब हे शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत का? असा सवाल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.