बोरी भागात द्राक्षबागांची मानेंकडून पाहणी

शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून दिला दिलासा : शासनाची मदत मिळावी

लासुर्णे – संततधार परतीच्या पावसाने इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवार (दि.2) रोजी सकाळी बोरी परीसरातील नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या द्राक्षबागांना पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी भेटी दिली. बागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शासनाने तातडीने सर्व पिकांचे पंचनामे करून हंगामातील पीककर्ज माफ करण्याची मागणी प्रवीण माने यांनी केली.

यावर्षी सुरू असणाऱ्या अतिरिक्‍त पावसामुळे बोरी, काझड, बिरंगुडी परिसरातील सुमारे अडीच हजार एकर क्षेत्रातील द्राक्षबागेचे नुकसान झाले आहे. बोरी परिसरातील शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात छाटणी केलेल्या द्राक्षबागेतील द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्यास सुरुवात झाली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे झाडाच्या पांढऱ्या मुळ्या अडचणीत आल्या असल्याने द्राक्षबागेमध्ये फळकुज व डाऊणी, बुरशी रोगाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात
झाला आहे.

शेतकऱ्यांनी द्राक्ष बाग जोपसण्यासाठी आत्तापर्यंत एकरी अडीच ते तीन लाख रुपये खर्च केला आहे. बोरी परीसरातील बहुतांश बागांचे नुकसान झाले आहे. माने यांनी नुकसानग्रस्त बागेची पाहणी करून तातडीने अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामे करण्याची मागणी केली. यावेळी बोरीचे सरपंच संदीप शिंदे, भारत शिंदे, रामचंद्र शिंदे, शशिकांत शिंदे, शिवाजी शिंदे, पांडुरंग झगडे, सहदेव शिंदे, प्रदीप शिंदे उपस्थित होते.

तुटपुंजी मदत नको – 
शासकीय नियमाप्रमाणे 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या फळबागांना हेक्‍टरी 54 हजार रुपये व कमी प्रमाणात नुकसान झालेल्या फळबागांना हेक्‍टरी अठरा हजार रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याने सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी बोरी गावचे सरपंच संदीप शिंदे यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.