तेलगू सिनेमा “जर्सी’च्या हिंदी रिमेकसाठी शाहिद कपूर कसून मेहनत घेतो आहे. हा सिनेमा क्रिकेटवर आधारलेला असल्यामुळे शाहिद कपूरने क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली आहे. सिनेमात त्याला प्रथमच एका खेळाडूचा रोल साकारायचा आहे.
“कबीर सिंह’नंतर आता नक्की कशा प्रकारचा रोल स्वीकारायला पाहिजे, याचा निर्णय घ्यायला त्याला थोडा वेळ लागला होता. पण जेंव्हा “जर्सी’चा हिंदी रिमेक करायचे ठरले, तेंव्हा त्याला मूळ तेलगू सिनेमा दाखवण्यात आला. “जर्सी’ बघितल्यावर हाच आपला पुढचा सिनेमा असणार हे त्याने मनोमन निश्चित करून टाकले होते.
सिनेमाचे शुटिंग पुढच्या महिन्यापासून चंदिगढमध्ये सुरू होणार आहे. सध्या आपल्या भूमिकेची तयारी करण्यासाठी शाहिद नियमितपणे मैदानावर क्रिकेट खेळतो आहे. त्याच्या मैदानावरच्या सरावाचा एक फोटोही सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
त्यामध्ये तो हातामध्ये क्रिकेटची बॅट घेऊन उभा असलेला दिसतो आहे. तेलगू “जर्सी’चे डायरेक्शन करणाऱ्या निन्नानाउरी यांच्यावरच हिंदी”जर्सी’चे डायरेक्शन करण्याचीही जबाबदारी आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी 28 ऑगस्टला रिलीज होणार आहे.