पिंपरी : हिंजवडी परिसरातून ट्रॅक्टर चोरुन ते बीड जिल्ह्यात विक्री करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तरुणांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली आहे. सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यरत असलेल्या या टोळीतील काही आरोपींवर मारामारी आणि स्त्री अत्याचाराचे गुन्हे देखील दाखल आहेत.
सागर कुमार हवाळे (वय 19, रा. लोणी, ता. परांडा, जि. उस्मानाबाद), करण तानाजी वायकर (रा. पिंपरी (पा), पोस्ट, साकत, ता. परांडा), तुषार भारत शिंदे (रा. लोणी ता. परंडा), राहुल म्हसू शिंदे (रा. लोणी ता. परांडा), गोकुळ धोंडीराम पवार (रा. भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे. मूळ रा. कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज दोन येथील बोडकेवाडी येथून 9 जून रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तीन लाख रुपये किमतीचा एक ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना घडली होती. याबाबत 16 जून रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस करीत होते.
गुन्हे शाखेचे पोलीस नाईक वासुदेव मुंडे, पोलीस शिपाई धनाजी शिंदे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणात चोरीला गेलेला ट्रॅक्टर हिंजवडीकडून हडपसरच्या दिशेने गेल्याचे समजले. तसेच आरोपींनी चोरी करण्यासाठी येताना वापरलेल्या मोटारसायकलची माहिती काढली. त्यानंतर ही मोटारसायकल उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील लोणी येथील सागर कुमार हवाळे याच्या नावावर असल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने परांडा शहर गाठले.
पोलिसांनी तीन दिवस उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यातील परिसरात सापळा रचून आरोपी सागर हवाळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याचे साथीदार करण वायकर, राहुल शिंदे, तुषार शिंदे आणि अन्य दोन मित्रांसोबत मिळून गेल्याचे सांगितले. सागरला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच त्याचे अन्य साथीदार पसार झाले होते. मात्र सागर याचा साथीदार करण याला बार्शी तालुक्यातील एका गावातून ताब्यात घेतले. करण हा एका गावातील शेतात लपून बसला होता. त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांचा तिसरा साथीदार राहुल शिंदे याला चिंचवड येथून ताब्यात घेतले.
तिघांकडे चौकशी केली असता आरोपींनी चोरलेला ट्रॅक्टर भेकराईनगर, फुरसुंगी येथील त्यांचा मित्र गोकुळ पवार याला 60 हजार रुपयांना विकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गोकुळलाही ताब्यात घेतले. सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपी राहुल आणि तुषार हे उस्मानाबाद जिल्हा पोलिसांच्या रेकोर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध हाणामारी आणि स्त्री अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत.