“तुमची गाडी पेट्रोलवर चालते पण मोदी सरकार कर वसुलीवर चालते”; राहुल गांधींचा सरकारवर पुन्हा निशाणा

नवी दिल्ली : देशात मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीं मुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. त्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी ट्विटरवर ‘आज पुन्हा दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या.  दिल्लीत पेट्रोलची किंमत १००.२१ रुपये आहे, तर डिझेल प्रति लिटर ८९.५३ रुपयांवर पोहोचले आहे’ अशी बातमी शेअर केली आहे.

इंधन दरवाढीमुळे वाढत्या कराचा बोजा सामान्यांनवर पडत आहे. त्यावरुन राहुल गांधींनी टीका केली आहे.”तुमची गाडी पेट्रोल चालत असेल किंवा डिझेलवर, मोदी सरकार कर वसुलीवर चालते!,” असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून काँग्रेस पक्ष पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा सातत्याने उपस्थित करत आहे आणि ११ जून रोजी पक्षानेह त्याविरोधात देशव्यापी आंदोलनही केले होते.

इंडियन ऑईलच्या संकेतस्थळानुसार आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३१ ते ३५ पैसे आणि डिझेलच्या दरात १५-२३ पैसे वाढ झाली आहे. आजच्या वाढीसह राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर १०० रुपयांच्या पुढे गेली आहे. यासह, देशातील चार मोठ्या महानगरांमध्ये पेट्रोलच्या किंमती याआधीच १०० च्या पुढ्या गेल्या आहेत. मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर होते.

५ राज्यांमधील निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा टप्पा मेपासून सुरू झाला, जो आतापर्यंत सुरू आहे. ४ मेपासून आतापर्यंत पेट्रोलच्या किंमतीत एकूण ३६ वेळा वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या किंमतीत ३४ वेळा वाढ झाली आहे. या वाढीमुळे इंधनाची किंमत आता देशातील बहुतेक पेट्रोल पंपांवर नव्या विक्रमावर पोहोचली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.